महाड येथील धर्मसंगर व इंग्रज सरकारची जबाबदारी ११३
अर्थी याजिलेलें आहे. हें उघड आहे. शांतता राखणें हा त्याचा हेतु त्या
मानानें गौण आहे. म्हणून आम्हांला असें वाटतें कीं, सरकारनें वरील १४४
व्या कलमाचा उपयोग करावा. या कलमाचा उपयोग करतांना हें ध्यानांत ठेवणें
जरूर आहे कीं, अस्पृश्य लोकांना आपले हक्क उपयोगांत आणावयास स्पृश्य लोक
प्रत्यक्षपणे तसेंच अप्रत्यक्षपणे प्रतिकार करितात. हे लोक प्रत्यक्षपणे दंडेली तर
करतातच पण अप्रत्यक्षपणें त्यांचे जीवित कठीण करुन त्यांना जेरीस
आणतात. व त्यांना आपल्या हक्काची अंमलबजावणी करण्यास अवसर देत
नाहींत. अस्पृश्य लोक मेलेली जनावरें खातात व भाकरी मागतात अशा प्रकारें त्यांना हिणविण्यांत येतें. व हेच स्पृश्य लोक अस्पृश्य लोकांनी असली भलतीं
कामें करावयाचें सोडून दिलें तर आपला अपमान झाला असें समजून कट करुन
त्यांना गांव बंद करतात, बाजार बंद करतात, त्यांची मोलमजुरी बंद करतात,
इतकेंच नव्हें तर कांही खुसपट काढून तंटेबखेडे करतात. अशा प्रकारें अस्पृश्य
लोकांना त्राही त्राही करून त्यांना जुन्या नव्या मार्गापासून परावृत्त करून
ताळ्यावर आणण्याचा निंद्य प्रयत्न करितात. अस्पृश्यांचे हक्क बजावण्याचे
बाबतींत जर त्यांना पूर्णपणें सरकारास साह्य करावयाचें असेल तर स्पृश्यांकडून
होणाऱ्या प्रतिकाराच्या अशा अप्रत्यक्ष प्रकारास देखील आळा बसेल इतक्या व्यापक प्रमाणांत वरील १४४ वे कलम अमलांत आणावें लागेल. वरील उपाययोजना
लागूं करण्याचें ठरलें तर सार्वजनिक पाणवठे व देवालयें या ठिकाणी वरील
कलमान्वये एक सर्व साधारण जाहीरनामा प्रसिद्ध करावा म्हणजे तो जनतेतील
सर्व लोकांस लागूं होईल. त्याजबरोबर स्थानिक ब्राह्मण्यग्रस्त पुढाऱ्यांचे हात
जामीनहि घेतले पाहिजेत. ही गोष्ट विशेष महत्वाची आहे. कारण नेहमीच्या
अनुभवाप्रमाणें कांही कर्मठ लोक अज्ञ समाजाच्या धर्म भावनेचा फायदा घेऊन
त्यास चिथावून देतात, व आपण नामानिराळे होतात. या बदमाषगिरीला आळा
घालण्यास त्यांचे जामीन घेणें हा सोपासाधा तसाच अत्यंत जरूरीचा व गुणकारक .असा उपाय आहे. त्याबरोबर अस्पृश्यांशी व्यवहार न करणाऱ्या व्यापाऱ्यांस विशेष प्रकारची ताकीद देणें आवश्यक आहे. ह्या कलमान्वये जो हुकूम करण्यांत येतो त्याची मुदत साधारणतः दोनच महिने असते. पण तेवढ्याने भागणार नाहीं असें आमचें मत आहे. अस्पृश्यतेची भावना फार जुनी आहे तीं
कायमची नष्ट होऊन स्पृश्य लोक अस्पृश्य लोकांबरोबर सलोख्यानें वागूं लागण्यास बरेच दिवस जावे लागतील. यामुळे मनाई हुकूम निरंतरचा
असावयास पाहिजे. १४४ व्या कलमांत निरंतरचा हुकूम करण्याचा अधिकार -स्थानिक सरकारास दिलेला आहे. तो अधिकार त्यांनी उपयोगांत आणावा अशी
आमची सूचना आहे.
डब्ल्यू-२०७३-८ अ