ब्राह्मणेतरांना अस्पृश्यांचे शत्रु दाखवून ब्राह्मणांना अस्पृश्य मित्र गणतील हा समज चुकीचा - Page 163

ब्राह्मणेतरांना अस्पृश्यांचे शत्रु... . . गणतील हा समज चुकीचा ११९

घेतला होता, इतकेंच नव्हे तर या बाबतींचे सारें खलबत एका ब्राह्मण वकिलाच्या घरीं झाले हें आम्हीं पुरतेपणी जाणून आहोत. अस्पृश्यांनी केलेले आरोप खोटे आहेत हें दाखविण्यासाठी रा. माटे यांनी जो पहिला मुद्दा मांडिला आहे तो असा की, भानुदास कांबळ्याच्या बायकोला मारलें नाही असें कांबळेच म्हणतो तर तिला मारली असे म्हणणारे लबाड नाहींत काय ? भानुदास कांबळे यांच्या बायकोला मारली किंवा नाही या मुद्यावर रा. कांबळे यांची साक्ष घेण्यास आम्हीं बिलकूल तयार नाही कारण ज्यानें आपली बायकापोरें शत्रूच्या टापूंत सोडून आपला दोन टन वजनाचा देह बचावण्यासाठी पोलीस ठाण्याचा आश्रय केला व त्यांचे काय झालें याची तीन चार दिवस पर्यंत वास्तपुस्तही केली नाही त्या पशूला सत्याची काय चाड असणार ! पण रा. माट्यांना आपल्या हकिकतीच्या खरेपणाबद्दल एवढा विश्वास वाटतो तर सभेत महाडच्या परिषदेला हजर असून झालेला प्रकार डोळ्यांनी पाहणाऱ्या लोकांनी खरी हकीकत सांगण्यास आपणांस अवसर द्यावा अशी विनंती केली असतांना देखील ती कां अमान्य करण्यांत आली ? या एका गोष्टीवरूनच माट्यांचे हकिकतीत किती खरेपणा असेल याचा सुज्ञांनी तर्क करावा. दुसरी गोष्ट रा. माटे यांनी पुढें आणिली आहे ती ही की, शेटजी भटजीनीं मारामारीत तर भाग घेतलाच नाही पण परिषदेपूर्वी व मारामारीनंतर अस्पृश्यांना सहाय्यच केलें व अशा सहाय्यकार्यांत महाड म्यु. पालिटीचे अध्यक्ष रा. टिपणीस यांचा नामनिर्देश केला आहे. पण दुसरीकडे छापलेल्या टिपणीसांच्या पत्रांतच । “ मी अस्पृश्यांना मदत केली नाही “ अशी कबुली दिली आहे. शितावरून भाताची परीक्षा होते तशी टिपणीसांसंबंधीच्या विधानाने माट्यांची हकिकत कितपत खरी आहे, याचा निकाल सहज होऊ शकतो. एवढी खोटी गोष्ट अगदी खरी म्हणून माट्यांनी कशी दडपून दिली याबद्दल कोणासही विस्मयच वाटेल. पण तसें होणें अगदी साहजिक आहे. चोरालां सारें जगच चोर वाटतें ; तसें रा. माट्यांना वाटलें असेल की, टिपणीसांनी मदत केली हें जरी खोटें असलें तरी काय टिपणीस तसें म्हणतील ! फुकाचा लौकिक पदरी पडत असतां तो कोण दूर लोटून देईल ? पण रा. टिपणीस यांनी माट्यांचा खोटेपणा चव्हाट्यावर आणण्यासाठी जी सत्यप्रियता दाखविली त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतों. आपल्या तंगड्या आपल्याच गळ्यांत आल्यावर आतां रा. माटे हे काय शक्कल लढवितात तें पाहूं.

†पाहा परिशिष्ट ६.