१२० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
महाड येथें घडलेल्या पाणी प्रकरणासंबंधी अनेक वृत्तपत्रांनी आपआपले विचार प्रगट केले. पण त्याबाबतींत केसरी कांही लिहील असे आम्हांस केव्हांच वाटलें नव्हतें. जेथे इतर वर्तमानपत्रांनी सदरील प्रकरणांची माहिती देण्याकरितां आपल्या पत्राचे दोन दोन चार चार कालम खर्ची घातले तीच बातमी अवघ्या ५० ओळीत आटवून शेवटी “ झाला हे प्रकार अत्यंत गर्हणीय झाला. “ इतके म्हणून ज्यानें विषयाची समाप्ती केली, तो केसरी पुन्हां या प्रश्नावर कांहीं लिहील हें अगदी असंभव्य होतें. कारण, सामाजिक सुधारणेच्या कार्याला विरोध करावयाचा हा केसरीचा नेहमीचा बाणा ! त्या बाण्याला बट्टा लागेल असें कृत्य केसरी केव्हांच करीत नाही, व त्याशीं विसंगत असलेल्या लेखास अगर मजकुरास सहसा जागा देत नाहीं. परिस्थितीत बराचसा बदल झाल्यामुळे केसरीच्या दृष्टींत थोडासा फरक झाला आहे खरा. मुसलमान लोकांच्या. तडाक्यांत आपला निभाव लागणार नाहीं या भयामुळें व स्वराज्याची मागणी उजळ माथ्याने मागतां यावी या इच्छेमुळें केसरी आतां पूर्वीप्रमाणे अस्पृश्यता निवारणास विरोध करीत नाहीं, व त्यासंबंधीं इतरांचे लेखांस जागा देतो. पण ' सुंभ जळलें तरी पीळ जात नाही ' तसें केसरीनें आपला बाणा कायमच ठेविला आहे. दुसऱ्यांचे लेख केसरी छापतो पण स्वतः कधीं कांहीं लिहीतो कां? जणू लिहिलेंच तर लिहिणाराचे हात झडतील ! इतकेंच नव्हे तर अस्पृश्यांना उत्तेजनपर कृति केसरी आपल्याकडून चुकून देखील घडूं देत नाही. आम्हांस पक्के आठवतें कीं, जेव्हा १९१९ साली आम्ही ' मूकनायक ' पत्र सुरू केलें तेव्हां केसरीला आमची जाहिरात फुकट छापा अशी विनंति केली होती. पण ती धुडकावून लावण्यांत आली ! तद्नंतर ' तुमचा आकार देतों, छापा ', असें लिहिल्यावर जागा रिकामी नाहीं, असें उत्तर देण्यात आलें ! इतकेंच नव्हें तर अभिप्रायही दिला नाहीं व परत भेटही दिली नाहीं. केसरीच्या अभिप्रायास आम्ही तीन दमड्यांचींही किंमत
देत नाहीं. राष्ट्राचा उत्कर्ष करूं पाहणाऱ्या या पत्रानें एकाद्या ब्राह्मणेतर लेखकासंबंधीं प्रशंसापर उद्गार केव्हांही काढलेले नाहीत. ब्राह्मणापेक्षां ब्राह्मणेतर गुणानें श्रेष्ठ आहेत असें म्हटल्याने आपल्या पुर्वजांसहीत-आपण रौरव नरकांत पडूं असें ज्यांना नेहमीचें भय वाटतें ते आमच्या सारख्या अस्पृश्य जातींतील माणसाने चालविलेल्या पत्राचा योग्य शब्दांत उल्लेख करतील याची आशा करणें नको. पण परत भेटीच्या सौजन्याला देखील केसरी उणा पडला होता हें सहसा कोणासही खरे वाटणार नाही. पण आम्हांस मात्र त्याची कल्पना होती. कारण केसरीचें हृदय आम्हांस पूर्णपणें अवगत आहे. एकमेकांचे विचार एकमेकांस कळावे व वादास तोंड लागून त्याचा निकाल व्हावा एवढाच काय तो भेटी परतभेटीचा उपयोग आहे. पण केसरीला वाटलें आपणांत व