महाड येथील धर्मसंगर व अस्पृश्य वर्गाची जबाबदारी - Page 175

महाड येथील धर्मसंगर व अस्पृश्य वर्गाची जबाबदारी. १३१

तत्त्वाचा पुरस्कार करणाऱ्या लोकांनी अस्पृश्य जनता अस्पृश्यतेची रूढी चालूं

राखण्यास कबूल नाहीं असें दिसून आल्याबरोबर त्या अनिष्ट रूढीचा त्याग

करावयास आपण सिद्ध आहोंत असें जाहीर करणें क्रमप्राप्त होतें. ज्याप्रमाणें

बंगाली लोकांचें मत बंगालच्या फाळणीविरूद्ध होतें त्याप्रमाणें साऱ्या अस्पृश्य

लोकांचे लोकमत अस्पृश्यतेच्या रुढीच्या विरुद्ध आहे. बंगालची फाळणी करणें

न करणें हें बंगाली लोकमतावर अवलंबून राहिलें पाहिजें असें जे छातीठोकपणें

सांगत होते त्याच लोकांनी अस्पृश्यता ठेवणें न ठेवणें हें अस्पृश्यांच्या लोकमतावर

अवलंबून राहावें असें कां कबूल करूं नये ? पण या दृष्टीनें या प्रश्‍नाकडे कोणीच

पहात नाहींत. स्वार्थ इतका बलवत्तर आहे कीं, आपल्या पायाखाली काय जळतें

इकडे चांगल्या माणसांचें सुद्धां लक्ष जात नाहीं. ज्या प्रसंगी इतरांस जें तो

करावयास लावतो तें तसा प्रसंग स्वतःवर आला असतां तो करण्याचें कसे टाळतों

याचा हा एक उत्तम मासला आहे. कसेंही असो, अस्पृश्य हिंदूंचे लोकमत

अस्पृश्यता निवारण्यास प्रतिकूल आहे ही गोष्ट अस्पृश्य लोकांनी ध्यानांत घेतली

पाहिजे.

तें अनुकूल कसें करतां येईल ?

हा अस्पृश्य जनतेपुढे मोठा महत्त्वाचा प्रश्‍न आहे व तो सोडविण्यास त्यांनी योग्य ती उपाययोजना केली पाहिजे. परंतु ही उपाययोजना निश्चित करण्यापूर्वी स्पृश्य लोकांच्या भावना दगडासारख्या कठीण कां झाल्या आहेत याचें पूर्ण

आकलन होणें अत्यावश्यक आहें.

कोणत्याही समाजात स्वत: विचार न करितां दुसऱ्याच्या विचारानें वागणारे असे लोक असतातच. धर्मोपदेशक सांगेल तो धर्म, वडील सांगतील ती आज्ञा, अधिकारी सांगेल तो हुकूम, मित्र देईल तो सल्ला मान्य करुन आपला व्यवहार चालविणारे असंख्य प्राणी या भूपृष्ठावर आढळून येतात. मग तो धर्म, ती आज्ञा, तो हुकूम व तो सल्ला योग्य आहे किंवा अयोग्य आहे, स्वार्थमूलक आहे किंवा निःस्वार्थ बुद्धीचा आहे याचा विचार करण्याची जबाबदारी हे निर्बुद्ध प्राणी आपल्या अंगावर केव्हांच घेत नाहींत. जसे स्वतः विचार न करतां दुसऱ्याच्या विचाराने वागणारे विचारशून्य लोक असतात तसेच विचार करूनही त्याप्रमाणें आचार न ठेवणारें लोकही दर एक समाजांत असतातच. नुसता विचार करून तो गांठीस बांधून ठेवण्यास कांहींच खर्च होत नाहीं. कोमल हृदयाच्या कुबेरासही जगांतल्या संपत्तीची वांटणी विषम प्रमाणांत होऊ नये हें तत्व पटते. वतनदार

जोशीही जोशी असावा तर तो पारंगत असावा हैं म्हणणें मान्य करतों. त्याप्रमाणें मागासलेल्या वर्गाला पुढें आणण्याकरितां सरकारी नोकरीत पहिली जागा त्यास