महाड येथील धर्मसंगर व अस्पृश्य वर्गाची जबाबदारी - Page 176

१३२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

द्यावी हा विचार पुढारलेल्या वर्गाच्या लोकांस नाकबूल नाही. पण खुद्द कुबेरावर आपली संपत्ती समसमान वांटून देण्याचा प्रसंग आला किंवा हुशार मांग जातीचा जोशी लाभला असतां आपली वृत्ति त्यास अर्पण करण्याचा कठीण योग वतनदार जोश्यांवर गुदरला किंवा स्वत:ला आंचवून मागासलेल्यास जागा देण्याची पाळी एखाद्या पुढारलेल्यावर आली तर या तिघांचेही तोंड वासेल यांत शंका नाहीं. हा मनुष्य स्वभाव ध्यानांत घेतला म्हणजे अस्पृश्य लोक एवढा अट्टाहास करीत असतां स्पृश्य लोकांना त्याचें कांहींच कां वाटत नाहीं याचा उलगडा सहज होईल. स्पृश्य समाजांत विचारशून्य लोक आहेत तसेच आचारशून्य लोक आहेत. विचारशून्य लोक अंधपरंपरेमुळे अस्पृश्यता बरी की वाईट याचा विचारच करीत नाहींत. आचारशून्य लोक अस्पृश्यता वाईट आहे हा विचार मान्य करतात पण मोठेपणाच्या स्वार्थाला बळी पडल्यामुळें त्यांच्या हातून विचाराप्रमाणें आचरण होत नाहीं.

अशा प्रकारें रोगाचें निदान कळून आलें असतांना अंधपरंपरेमुळें व स्वार्थामुळें आमच्या म्हणण्याचा प्रकाश ज्यांच्या डोक्यांत पडत नाहीं त्यास ताळ्यावर आणण्यास आम्ही कोणता उपाय योजिला पाहिजे एवढाच काय तो प्रश्‍न उरतो. आमच्या मतें स्पृश्य हिंदूंच्या वागणुकींत फेरबदल घडवून आणावयाचा असेल तर प्रथमतः त्यांच्यांतील

विचारशून्य लोकांस विचार करणें भाग पाडले पाहिजे.

पण विचार हा कांही एखाद्या ज्वालामुखीप्रमाणें आपोआप पेट घेत नाहीं. तो कांहीं कारणपरत्वेंच प्रज्वलित होतो. ज्यांच्यांत विचारजागृति करावयाची असेल त्यांना विचार करण्यास कारण घडवून आणलें पाहिजे हें आमच्या अस्पृश्य बंधूंनीं विसरतां कामा नये. रूढ मार्गानें जाणारा वाटसरू जोपर्यंत रस्ता सरळ आहे, त्याला वाटा फुटल्या नाहीत, तोपर्यंत डोळे झांकून कांहीं एक विचार न करतां चाल चालत असतो. त्याला विचारपूस करण्याची जरुरीच नसते. पण जेव्हां कां रस्त्याला वाटा फुटलेल्या दिसतात तेव्हां तो थबकतो, गोंधळून जातो आणि यांतील आपल्या मुक्कामावर नेणारा मार्ग कोणता याचा तो विचार करावयास लागतो. यांवरून उघड आहे कीं, रूढ झालेल्या मार्गात हरकत उत्पन्न झाली नाहीं, अडथळा भासला नाहीं, तोपर्यंत कोणीही आपल्या पुर्वापारच्या रूढ मार्गाच्या बरे वाईटपणाबद्दल विचार करण्यास प्रवर्त होत नाहीं. हाच न्याय स्पृश्य लोकांतील विचारशून्य लोकांस लागूं केला तर असें दिसून येईल कीं, अस्पृश्यतेची रूढी चालूं राहिली याचें मुख्य कारण म्हटलें म्हणजे अस्पृश्य लोकांनी त्या रूढीस कधींच हरकत घेतली नाही हेंच होय. त्यांनीं जर हरकत घेतली असती तर स्पृश्य लोकांस अस्पृश्यतेच्या कल्पना कधींच बदलाव्या लागल्या असत्यां. वाईट