१३४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
सत्ताधारी लोकांच्या वागणुकींत बदल घडवून आणणें या दोन्हीं गोष्टींत फार अंतर आहे. ज्या ठिकाणी मनुष्याच्या मताचा त्याच्या स्वार्थाशी कांही संबंध नसतो तेथें त्याच्या मतांत फेरबदल घडवून आणण्यास वादविवाद, चर्चा, उहापोह इत्यादि सामोपचाराचे उपाय बस्स होतात. पण ज्या ठिकाणीं मनुष्याच्या मताचा त्याच्या स्वार्थाशी संबंध असतो, त्या ठिकाणी त्याच्या स्वार्थास चट्टा बसल्याखेरीज नुसत्या सामदामानें त्याची वागणूक बदलत नाही. हा व्यवहारांतील सामान्य नियम आहे. याची साक्ष कोणीही देऊं शकेल. हा न्याय स्पृश्य हिंदूंतील विचारी लोकांस लागूं केल्याखेरीज ते विचाराप्रमाणें आचरण करण्यास प्रवृत्त होणार नाहींत. या दिशेनें पहातां स्पृश्य हिंदूंच्या हितास चट्टा बसेल असें आपणांस कांहीं करतां येण्यासारखें आहे काय, हे अस्पृश्य समाजानें अवश्य शोधून पाहिलें पाहिजे. स्पृश्य लोक सधन आहेत, अस्पृश्य लोक दरिद्री आहेत. स्पृश्य लोक बहुसंख्यांक आहेत, अस्पृश्य अल्पसंख्यांक आहेत. स्पृश्य लोकांचे हातांत सत्ता आहे, अस्पृश्य लोक अगदीं सत्ताहीन आहेत. यावरून साधारण माणसास असेंच वाटेल कीं, स्पृश्यांचे अस्पृश्यांवाचून चालण्यासारखें आहे. पण अस्पृश्यांचे स्पृश्यांवाचून चालणें शक्य नाहीं. असें असतां स्पृश्य हिंदूंच्या हितास चट्टा बसविण्याचा प्रयोग करून काय होतें, हें पहाण्याच्या भानगडींत अस्पृश्य लोक पडले तर आपलें हासे करून घेतील. इतकेंच नाहीं तर तोंडघशी पडतील, असें कुचेष्टेखोर लोकांनाच काय पण अस्पृश्यांनाही वाटण्यासारखें आहे. पण ही स्पृश्य व अस्पृश्य लोकांच्या बलाबलाची पाहणी अगदीं वरवरची आहे हें आमच्या अस्पृश्य बंधूंनी ध्यानांत घ्यावें. संसारिकदृष्ट्या पहाणी करणारांना अस्पृश्य समाजाच्या खऱ्या सामर्थ्यांचा थांगपत्ता केव्हांच लागावयाचा नाहीं. म्हणून आमच्या अस्पृश्य बंधूंनां तसेंच आमच्या स्पृश्य हिंदूंनां आम्ही इशारा देत आहोंत | कीं, अस्पृश्य लोक कांहीं बाबतीत जरी बलहीन असले तरी सर्वच बाबतींत ते दुर्बल आहेत असा गैरसमज कोणीच करून घेऊ नये. आज हिंदुधर्मावर अस्पृश्य लोकांनीं बहिष्कार पुकारला व मुसलमानी धर्माची दीक्षा घेतली तर हिंदु समाजाचें काय होईल याचा स्पृश्य हिंदूंनी अवश्य विचार करावा. अस्पृश्य लोकांनीं धर्मातर केलें तर त्यांत काय वाईट झालें. निर्भेळ स्वराज्य मिळण्याऐवजीं फार तर वसाहतींचे स्वराज्य मिळेल असें बऱ्याच सनातन धर्मवादी लोकांचे मत आहे हें आम्ही जाणून आहोंत. परंतु असें म्हणणारांनीं या प्रश्नाचा खोल विचार केला आहे असें आम्हांस वाटत नाहीं. या लोकांना जाणीव नाहीं कीं, चालूं असलेला वाद हा स्वराज्याचा वाद नसून हिंदुमुसलमानांच्या संस्कृतींचा संग्राम आहे. त्यांत अस्पृश्यांची कुमक त्यांच्या संख्येच्या मानानें फार महत्त्वाची आहे. आज अस्पृश्य लोक हिंदूंचे हिंदु जर राहिले तरच आर्यधर्माची संस्कृति या देशांत निभवणार