महाड येथील धर्मसंगर व अस्पृश्य वर्गाची जबाबदारी - Page 179

महाड येथील धर्मसंगर व अस्पृश्य वर्गाची जबाबदारी. १३५

आहे. उलट ते जर हिंदूंचे मुसलमान झाले तर या देशांत आर्यसंस्कृतीचा पाडाव

होऊन यावनी संस्कृतीचे प्राबल्य होणार आहे. आणि या घडामोडी घडवून

आणण्याचे सामर्थ्यं एकट्या अस्पृश्यवर्गात आहे, दुसऱ्या कोणात नाहीं, यांत

बिलकूल संदेह नाहीं. मुसलमानांना आपल्याशिवाय जय नाहीं व हिंदूंचा

आपल्याशिवाय गति नाहीं एवढेंच जर आमच्या अस्पृश्यबंधूंनी ध्यानात घेतलें तर त्यांच्या आंगीं केवढे मोठें सामर्थ्य सांठविलेलें आहे याची त्यांना कल्पना होईल व या सामर्थ्याचा त्यांनी अशा आणीबाणीच्या प्रसंगीं उपयोग केला आणि त्यांस बहिष्कृत करणाऱ्या स्पृश्यहिंदुसमाजावर त्यांनीं बहिष्कार घातला तर त्यांना या बेगुमान स्पृश्य लोकांस सहज ठिकाणावर आणतां येईल. ही शक्ति कांहीं थोडी थोडकी नाहीं. तिची ओळख झाली व तिचा अशापरीं उपयोग केला तर स्पृश्य लोक वठणीवर येण्यास मुळीच अवसर लागणार नाहीं अशी आमची ठाम समजूत आहे. म्हणून आमच्या अस्पृश्य बंधूंस आमची आग्रहाची सूचना आहे कीं, त्यांनी आपली ही शक्ति अकर्तव्यतेच्या डेऱ्यांत पुरून न ठेवतां हा

बहिष्कार योग अंमलात आणावा

यांत मागें पुढें पाहूं नये.

आम्हीं हे जें दोन उपाय सुचविले आहेत त्याबद्दल कांहीं स्पृश्य लोक आम्हांस अविचारी म्हणतील हें आम्हीं जाणून आहों. पण त्यांना आमचा सवाल आहे कीं, अस्पृश्य लोकांनीं हें उपाय योजूं नयेत तर त्यांनीं करावें तरीं काय ? सर्व लोकांचें एक बील होऊन अस्पृश्यांनी आपलें म्हणणे स्पृश्य लोकांपुढें मांडावें हा जुना नेमस्तपणाचा शिरस्ता आहे पण आज २५/३० वर्षांच्या चळवळीच्या इतिहांसापासून अत्यंत महत्त्वाची जी गोष्ट निष्पन्न झाली आहे ती ही कीं अस्पृश्यांचें म्हणणें कितीही संयुक्तिक असलें, त्यांचीं गाऱ्हाणी कितीही साधार असली, त्यांच्या मागण्या कितीही न्यायाच्या असल्या, त्यास कितीही लोकांची सम्मती असली व त्या त्यांनी स्पृश्य हिंदूपुढे कितीही नेमस्तपणे मांडल्या, तरी त्यांच्याकडे लक्ष न देतां केवळ सत्तेच्या जोरावर अस्पृश्यांच्या लोकमताची पायमल्ली करून स्पृश्य हिंदु आपला हेका तडीस नेतात. असें असतांना जे अस्पृश्य लोकांना तुम्ही प्रतिकार योग अथवा बहिष्कार योग स्वीकारं नका असा उपदेश करतात, त्यांना काय म्हणावें हेंच आम्हांस कळत नाहीं. अस्पृश्यता हजारों वर्षापासून चालत आली आहे तर आणखी शंभर वर्षे राहिली तर काय हरकत आहे, असा साळसुदपणाचा सल्ला हे लोक देत असतात पण आम्हांला या लोकांस स्पष्टपणें सांगणें आहे कीं,