महाड येथील धर्मसंगर व अस्पृश्य वर्गाची जबाबदारी - Page 181

महाड येथील धर्मसंगर व अस्पृश्य वर्गाची जबाबदारी, १३७

“ सुधारणा फुकाफुकी घडत नसतात, समाजास कोणती गोष्ट आपल्या उत्कर्षाच्या आड येते हैं प्रत्यक्ष कळावें लागतें. आणि तें कळलें म्हणजे समाज

आपोआपच हे अडथळे दूर करण्यास प्रवृत्त होतो.” अस्पृश्यता आपल्या

उत्कर्षाच्या आड येते याचा प्रत्यक्ष अनुभव हिंदुसमाजाच्या अनुभवाला आणून देण्यास बहिष्कार योगाशिवाय दुसरें साधन अस्पृश्य वर्गाचे हाती कोणतें आहे ? आहे त्याचा देखील उपयोग त्यांनीं करूं नये तर स्पृश्यांच्या लहरीला रुचेल तसें त्यांनी रहावें काय ! आम्हीं तरी बहिष्कार योगाचा मार्ग सुचविला आहे तो टिळकांचा मार्ग आहे. फरक इतकाच की त्यानी तो राजकारण प्रसंगी योजीला होता. आम्ही तो समाजकारणप्रसंगी योजावा म्हणून सांगत आहोत. असें असतांना शंभरांतून एकाला ज्या राजसत्तेची आंच लागते तिंचा नायनाट करण्यासाठी टिळकांनी तिच्यावर बहिष्कार योग पुकारावा व त्याला सर्वानी माना डोलवाव्या आणि ज्या धार्मिक सत्तेच्या अग्नीत दरेक अस्पृश्यांची माणूसकी जळून खाक झाली आहे तिच्या विरुद्ध अस्पृश्यांनी बहिष्कार पुकारावा असा आम्हीं सल्ला दिला असतां आम्हांला दूषण देण्यांत यावें हा कोठला न्याय ? आमच्या या मित्रास आमचें असें सांगणें आहे कीं, तुम्हीं आमचे कितीही जरी हितचिंतक असला तरी प्रस्तुत प्रकरणी सनातनधर्मी म्हणून, सनातन धर्माचे आधार म्हणून व सनातन धर्माचे अधिकारी म्हणून या कामीं आम्हास उपदेश करण्यास तुम्ही अपात्र आहांत. कारण हा प्रश्‍न अधिकाराचा, जातीचा, स्वार्थाचा व मनोधर्माचा आहे. विद्येचा, ज्ञानाचा अगर बुद्धीचा नव्हे. हा तुमच्या आंगचा दोष परिस्थितीप्रमाणे तुमच्यांत सहज उत्पन्न झाला आहे हें ओळखून तुम्ही आम्हांस उपदेश करण्याच्या भानगडीत पडूं नका. व जर पडाल तर आम्हांस नेमस्तपणाच्या बाहेर जाऊं नका असा सांगण्याऐवजी आपल्या स्पृश्य बांधवांस असा उपदेश करा कीं, “ अस्पृश्य लोक आतां निकरावर येऊ लागले आहेत. करितां आपली सहानुभूति HAA व्यक्त होईल असा मार्ग धरा “. असा उपदेश जोपर्यंत तुम्ही करीत नाहीं तोंपर्यंत हा नेमस्तपणाचा मार्ग फलदायक होईल, अशा तऱ्हेची खोटी आशा दाखवून किंवा थापा मारून तुम्हांस अस्पृश्यांच्या प्रगतीचा

ओघ खुंटविणें किंवा बंद पाडणें आतां अगदी अशक्य आहे. आम्ही हवा तसा

हंबरडा फोडावा, आकाश पाताळ एक करावें, आणि आमचे मागणें न्याय असतांही तिकडे साफ दुर्लक्ष करून केवळ मनगटाच्या जोरावर आहे तसें आणखी कांहीं दिवस चालूं द्या असें बेशरमपणें पुन्हां आम्हांस सांगावें हैं कांही ठीक नाहीं. कोणी कांहीही म्हणो पण हा अन्याय आणखी एक दिवसही सहन करण्यास आम्ही तयार नाहीं, मग पिढ्या दोन पिढ्याची गोष्टच नको.