१३८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
हजारों वर्षाची अस्पृश्यता चुटकी सरशी नष्ट करण्यांस अस्पृश्य लोक प्रवृत्त झालें आहेत हें पाहून कांहीं स्पृश्य लोकांस हसूं येईल हें आम्ही जाणून आहो. पण त्यांच्या हसण्यानें आम्हाला मुळींच खंती वाटत नाही. कारण आम्हीं सांगितलेलं उपाय इतके तीव्र व जालीम आहेत कीं, त्यांनी स्पृश्य लोकांच्या वित्तासच नव्हे तर त्यांच्या जीवितासही त्यामुळे धक्का पोहोंचणार आहे ? इतक्या जालीम उपायानें कोण शरण येणार नाही ? आम्हाला तर असें वाटतें की दोन्ही योगाचा डब्बल गोळीबार करण्याचे कारण नाहीं. गनीम इतका कमकुवत आहे की बहिष्कार योग मागें ठेऊन सुरवातीस प्रतिकार योगच आरंभीला तरी देखील कार्यभाग होण्यासारखा आहे. आणि तोहि फार दिवस करावा लागणार नाही. " तप्तेन तप्तायसा घटणाय योग्यम्. “ लोखंडाचे दोन तुकडे तापून सारखे लाल झालें कीं ते एक होण्यास विलंब लागत नाहीं. तसेंच योगास प्रतियोग भेटला कीं उभयपक्षांत समेट झालाच म्हणून समजावें. प्रश्न एवढाच आहे कीं आमच्या अस्पृश्य बंधूंच्या हातून
हा कठीण योग तडीस जाईल काय ?
या ठिकाणीं आमच्या अस्पृश्य बंधूंस एका गोष्टीची आठवण करुन देणें आम्हांस क्रमप्राप्त आहे. वनपर्वात धर्मराजास भीमानें सांगितलें आहे की, स्वतःचें राज्य नष्ट झालें असतां तें ' दे ग बाई जोगवा ' म्हणून मिळत नसतें. भिक्षा मागणें हा ब्राह्मणांचा धर्म आहे. क्षत्रियांचा नव्हें. या करितां भिक्षा मागणें सोडून दे. तेजाचा आश्रय कर, म्हणजे तुझे हेतु साध्य होतील. नुसत्या धर्मबुद्धीनें कांहीं होणार नाही. आमच्या मतें हीच नीति अस्पृश्यवर्गास सांगण्याची वेळ आतां आली आहे. रडणें, भिक्षा मागणें किंवा इतरांच्या धर्मबुद्धीवर अवलंबुन राहणें, यानें हरण केलेलें स्वत्व परत येत नसतें. ज्यानें त्यानें आपल्या तेजानेच तें साध्य केलें पाहिजे. आम्ही जो प्रतिकार योग सांगितला तो योग बिकट आहे खरा, आणि योगास प्रतियोग होईल हेंही आम्ही जाणून आंहों. पण आपण प्रतिकार केला असतां स्पृश्य लोक त्यास प्रत्युत्तर देतील म्हणून आमच्या अस्पृश्य बंधूंनीं भिऊन जातां कामा नयें. ते जर प्रतिकार करतील, तर त्यांचा प्रतिकार करण्यास त्यांनी सिद्ध झालें पाहिजें. त्या शिवाय भागणार नाही. आमच्या अस्पृश्य
बंधूंनीं
या कामी आपलें तेज प्रकट केलें पाहिजे
एवढे पथ्य जर त्यांनीं सांभाळिलें तर आम्ही दिलेली मात्रा विफल होणार नाहीं, याबद्दल त्यांनी निःशंक राहावें.