सार्वजनिक सोईचा उपयोग करूं देणे हा कायद्याचा प्रश्न आहे, शिष्टाचाराचा नव्हे - Page 188

१४४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

व तेवढ्या पुरती आमची मागणी आहे. सार्वजनिक तलावांचा., देवळांचा उपयोग करणें, करूं देणे हा कायद्याचा प्रश्‍न आहे, शिष्टाचाराचा नव्हे. त्यांत कोणी हरकत केली तर त्याबद्दल जावडेकर भटजीस आणि जेनुद्दीन मौलवीस दावा करण्यास जितका अधिकार आहे तितकाच अधिकार जिव्या मांगास आहे.

हे कायदेशीर हक्‍क उपभोगीत असतां सर्वांनाच सर्वांशी सहचार करणें प्राप्त आहे. असें करणें ज्यांना खपत नाही त्यांनी आपले काळें तोंड घेऊन देशत्याग करावा अगर समुद्रांत उडी घालून आपला नायनाट करून घ्यावा. शिष्टाचार व कायदा यांतील भेद इतका उघडा आहे की कोणाही सामान्य बुद्धीच्या माणसास कळण्यासारखा आहे. पण भालाकारांत सामान्य माणसाची तरी बुद्धि कोठे आहे ? आणि जरी असली तरी ज्यानें सारें आयुष्य कुचेष्टा करण्यांत घालविले अशा दुर्बुद्धीला खरा अर्थ समजून घेण्यास लागणारें शील कोठून असणार ! ज्याची विचारशक्ति पशूंच्या विचारशक्‍तीहून जास्त दूरवर गेलेली नाहीं व जो खऱ्या शीलाला पारखा झाला आहे अशा खडकाला शिव्याशापाचे अगर सुविचाराचे कितीही स्नान घातलें म्हणून त्याच्या अंतर्यामांत काही ओलावा उत्पन्न होणार आहे काय ? कुत्र्याचे शेपूट नळींत घातलें तरी तें सरळ होणार नाही. विरडीला जाणारें ढोर कांही केले तरी गेल्याशिवाय राहाणार नाही. तीच गत भालाकाराची आहे. मग या शिंगे लाउन शहाण्यांत मोडू पहाणाऱ्या मूर्खाबरोबर लागण्यांत काय अर्थ आहे ?

आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. ३ जून १९२७.