तर त्यांनी आधीं शहाणपण शिकले पाहिजे - Page 189

३१

. . . - तर त्यांनी आधीं शहाणपण शिकले पाहिजे

मुंबईतील महार व मांग यांच्यांत झालेल्या सहभोजनासंबंधींचे एक पत्रा या अंकात दुसरीकडे छापले आहे. आम्ही अस्पृश्यवर्गातफे कायद्यानें प्राप्त होणाऱ्या हक्कांपेक्षा जास्त कांहीं मागत नाहीं पण इतरांना हक्क देतांना कायदेशीर हक्कच नव्हे तर शिष्टाचारावर अवलंबून असणारे हक्क देखील तुम्ही तुमच्या खालीं असतील त्यांना द्या असें अस्पृश्य वर्गास सांगणें हें आमचे कर्तव्य आहे असें आम्ही समजतो. म्हणून सहभोजनांत भाग घेणाऱ्या महारबंधूचें आम्ही अभिनंदन करतों. त्यांना विरोध करणाऱ्या महार लोकांना त्याच पत्रांत खरमरीत उत्तर मिळालेंच आहे. तेव्हां विशेष लिहिण्याची जरूरी नाहीं. महारांतील ब्राह्मण्य जरी क्षम्य असलें तरी तें पापच आहे. त्याची तरफदारी कोणी शहाणा करणार नाहीं. हे ब्राह्मण्याचे भूत ज्या महार लोकांत असेल त्यांनी तें आपल्यांतून जितक्या लवकर घालवून देतां येईल तितक्या लवकर घालवून देणें बरें. त्याचबरोबर मांग लोकांनींहि हें ध्यानांत ठेवावें कीं, टाळी एका हातानें वाजत नसते. आम्हांला ठाऊक आहे कीं, जे मांग पुढारी मांग जातींत जागृति करण्याकरितां दौरा काढतात ते मांगांना महारा विरुद्ध उठविण्याचा प्रयत्न करतात. कित्येक ठिकाणीं महाराचे हातचे आपण खाणार नाहीं अशा बेलभंडार घेऊन आणाशपथा मांग लोकांना त्यांच्या पुढाऱ्यांनी घ्यावयास लावल्याचें आमच्या कानांवर आलें आहे. महारांच्या घरचें न खाण्याच्या शपथा मांग लोकांनीं सर्रास वाहील्या तर त्या पासून आम्हाला आनंदच आहे. पण त्या पेक्षां कोणत्याच जातीच्या हातचें आपण खाणार नाहीं अशा शपथा त्यांनी वाहील्या तर अधिक बरें ; कारण अशानें मांग लोकांतील जागृति केवळ महारांचा द्वेष करण्याकरितां होत नसून मांग जातीची उन्नति करण्याकरतां होत आहे या बद्दल कोणास शंका वाटणार नाहीं. यास्तव इतर कोणत्याहि जातीचें उष्टे खा पण महार जातीचें खाऊं नका असा क्षूद्र बुद्धीचा उपदेश करणाऱ्या मांग पुढाऱ्यांना आमची अशी सूचना आहे कीं, महारामांगांमध्यें सहभोजन सुरु व्हावें अशी जर त्यांची इच्छा असेल तर त्यांनी . आधीं शहाणपण शिकले पाहिजे.

७०७७

1 पाहा, परिशिष्ट क्रमांक-१०.

आजकालचे प्रश्न : बहिष्कृत [भारत, ] [ता. ] [३ ] [जून ] [१९२७. ]

डब्ल्यू-२०७३-१० अ