ब्राह्मणांच्या हातचे शिक्षण या काळांत कोणासच चालणे शक्य नाही. - Page 190

३२
ब्राह्मणांच्या हातचे शिक्षण
या काळांत कोणासच चालणें शक्‍य नाही.

मुंबई इलाख्यांतील शिक्षण खात्याचा १९२४-२५ सालचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यांत ट्रेनिंग कॉलेजांत ज्या लोकांचा १९२४-२५ साली प्रवेश झाला त्या लोकांच्या जातवारीचा तपशील खालील प्रमाणे केला आहे.

ब्राह्मण व मराठा व अस्पृश्य व

तत्सम जाती तत्सम जाती तत्सम जाती

पूर्व भाग १२३ १४२ ७

मध्य भाग २१९ २९३ ३५

दक्षिण भाग ९ ३१ ४

एकूण ३५१ ४६६ ४६

या इलाख्यांतील लोकसंख्येत ब्राह्मण व तत्सम जातींचे लोक शेकडा ९, मराठा व तत्सम जातींचे लोक शेकडा ५७ व अस्पृश्य व तत्सम जातींचे लोक शेकडा २३ आहेत. लोक संख्येच्या प्रमाणावरून जर पाहिले तर ब्राह्मण व तत्सम जातींना ७६, मराठी व तत्सम जातींना ५१०, अस्पृश्य व तत्सम जातींना २६७ अशा जागा अनुक्रमें ट्रेनिंग कॉलेजात मिळावयास पाहिजे होत्या. या दृष्टीनें पाहिलें तर मराठा व तत्सम जातींचा वा बाबतीत म्हणण्या सारखा काही तोटा झालेला दिसत नाही. पण अस्पृश्य वर्गाचा सारा हिस्सा ब्राह्मण लोकांनी गिळंकूत केलेला दिसतो ! आमच्या मतें ही गोष्ट अत्यंत विपरित आहे. स्पृश्य लोकांस हजारों धंदे मोकळे आहेत. वाटेल त्या रितीने त्यांना आपले पोट भरता येण्यासारखे आहे. पण अस्पृश्य वर्गातील लोकांस शिक्षकाच्या धंद्यासारखा साधा, सोपा, सुसाध्य असा दुसरा धंदा नाही. पण त्यांतही त्यांचा प्रवेश होऊ नये म्हणजे अन्यायाची कमाल झाली असेंच म्हटलें पाहिजे. धंद्याच्या दृष्टीनें तर हा अन्याय आहेच पण सामाजिक दृष्ट्या देखील शिक्षक वर्गांत अस्पृश्य लोकां ऐवजीं ब्राह्मण लोकांचा भरणा होणें आमच्या मतें अगदी अनिष्ट आहे. शिक्षक वर्ग हा राष्ट्रांतील सारथी वर्ग आहे. कारण त्यांच्या हाती शिक्षणाच्या दोऱ्या असतात. यास्तव शिक्षक कोण असावा या सारखा समाजहितांच्या दृष्टीनें दुसरा

डब्ल्यू-२०७३-१० ब