अशा दुष्ट व पापी लोकांच्या पारिपत्यासाठी पिनल कोडांत नवे कलम कां नसावे ? - Page 192

३३
अशा दुष्ट व पापी लोकांच्या पारिपत्यासाठी
पिनल कोडांत नवे कलम कां नसावे ?

काठेवाडांत लाठी म्हणून एक खेडेगांव आहे. त्या गांवांत जेठालाल माणसूर परमार नावांचे एक अस्पृश्य शाळा मास्तर राहतात. त्या बिचाऱ्यावर जो एक अनिवार प्रसंग गुदरला त्याची हकिकत नुकतीच प्रसिद्ध झालीं आहे. या गुहस्थाची बायको गेल्या ५ एप्रील रोजीं बाळंतीण झाली. आणि लगेच दोन दिवसांनी ती आजारी पडली. जवळच धांगध्रा येथें प्राणजीवन नांवाचा डॉक्टर होता. त्याला आणण्या करितां मास्तर त्याजकडे गेले, आणि आपल्या बरोबर चला म्हणून विनंती केली. "मी धेडवाड्यांत येणार नाहीं व धेडजातींच्या रोग्यास तपासून स्वतःस विटाळून घेणार नाही“ असें म्हणून त्या बिचाऱ्याला त्यांनें झिडकारुन लावलें. नंतर त्यानें त्या शहरच्या नगरशेटकडे या डॉक्टरवर आपले वजन खर्च करा म्हणून विनंती केली. नगर शेटच्या भीडेनें डॉक्टर महाशय कबुल झाले, परंतु “मी या अस्पृश्याच्या घरांत येणार नाही; त्या बाईला बाहेर आणीत असाल तर तिला पाहीन.“ अशी अट घातली. या दुर्देवी शिक्षकांने ती अट कबूल करून दोन रुपये फी वर तो डॉक्टरला घरी घेऊन गेला. डॉक्टर आल्यानंतर दोन दिवस आपल्या जिवाशीं झगडत अंथरूणावर पडलेल्या त्या बाळंतीण बाईस रात्री ८ वाजता घराबाहेर आणले. डॉक्टरने आपलें उष्णता . मापक यंत्र काढलें पण अंगास तो लावीना किंवा तिच्या नवऱ्याच्या हातांत देईना. जवळच्या एका मुसलमानाला मध्यस्थ म्हणून उभा केल्यानंतर कोठें डॉक्टर रोग्याची परीक्षा करण्यास तयार झाला. पहिल्यांदा तें यंत्र डॉक्टरने मुसलमानाच्या हातीं दिले, त्यांने त्या बाईच्या नवऱ्याच्या हातीं दिलें, त्यानें तें आपल्या बायकोच्या अंगाला लावले. काम झाल्यानंतर पुन्हा तें त्यानें मुसलमानाच्या हातांत दिलें व शेवटी मुसलमानाच्या हातून डॉक्टरने घेतलें. दिव्याच्या अंधुक प्रकाशांत यंत्रावरचा तापाची मर्यादा दाखविणारा आंकडा डॉक्टरने वाचला. अंगाला हात न लावतांच निमोनिया झाला आहे म्हणून सांगितले. फी घेतली आणि औषध पाठवितो असे सांगून निघून गेला. नंतर पुढें सहा तासांनी त्या बाईचे प्राणोत्क्रमण झालें | डॉक्टरच्या ह्या अमानुष कृतीची हकिकत वाचून कोणास तिडीक येणार नाही? डॉक्टरची करणी म्हणजे