अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ - Page 198

१५४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

सामाजिक असले तरी ते राजकीय मागणीच्या आड येऊं शकत नाहींत आणि म्हणूनच कै. तेलंगप्रभृती सारख्या विलक्षण लोकांना सामाजिक परिषदवाल्यांचा बुद्धीवाद पसंत पडला नाहीं. पण तोच त्यांनी जातीभेद व अस्पृश्यता अशा सामाजिक अन्यायांचा आधार घेतला असता तर तेलंगाना नव्हे कोणलाहि त्यांना निरूत्तर करतां आलें नसतें. पण त्यांची दृष्टि कुलाचाराच्या पलिकडे गेली नाही. स्वजातीच्या लोकांची शुद्धता करण्यांत त्यांनी सारा वेळ घालविला. आणि सामाजिक सुधारणेचा जप करूनही जातीभेद व स्पर्शास्पर्श भेद होता तसा ठेवून गेले.

या आधुनिक काळांतील सामाजिक परिषद वाल्यांच्या जागीं आतां नवीन सुधारणावादी उत्पन्न झाले आहेत. जुन्यांची जशी सामाजिक परिषद होती तशी नव्यांची हिंदु महासभा ! या हिंदु महासभेचे उगम स्थान म्हणजे आर्यांचे मूळ वसतिस्थान जे पंजाब तें होय. १९०९ च्या सुमारास जेव्हां मुसलमानांनी काँग्रेस मधून फुदून जाऊन मुसलमान वर्ग सुसंघटित करण्याच्या उद्देशानें मुस्लिम लीग* काढली तेव्हां योगास प्रतियोग म्हणून

पंजाब हिंदुसभा

या नावांची एक संस्था प्रस्थापित केली गेली. स्थापन झाल्यापासून चार वर्षे पावेंतो या संस्थेच्या कार्याचे क्षेत्र पंजाबापुरतेंच होतें. पण १९१३ सालीं ही संस्था आपल्या प्रांताची सरहद्द ओलांडून अंबाला येथें भरविण्यांत आली. व त्या ठिकाणीं असा ठराव करण्यांत आला कीं, हिंदु समाजाच्या प्रश्‍नांची वाटाघाट करण्यासाठी अखिल हिंदु जनांची १९१५ सालीं एक परिषद हरिद्वार येथें भरविण्यांत यावी. त्या प्रमाणे महाराज मुनिंद्रचंद्र नंदी यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा झाली व त्या सभेंत पंजाब हिंदु सभेच्या ऐवजीं

सर्व देशीक हिंदु सभा

या नांवाची एक संस्था स्थापन करण्यांत आली. संस्थेचा मुख्य उद्देश हिंदु समाजास संघटित करून त्यास एकरूप व एकजीव करणें हा होता. सभेला महाराज कासिम बझार यांच्यांसारखे अध्यक्ष, तीन शंकराचार्य धरून तेरा उपाध्यक्ष, लाला सुखवीरसींग सारखे सेक्रेटरी व चार मदत सेक्रेटरी आणि निरनिराळ्या प्रांतातून नियोजित केलेले पन्नास सल्लागार नियोजित केले होतें. एवढया मोठ्या डामडौलानें स्थापित केलेल्या सर्व देशीक हिंदु सभेच्या हातून हिंदु समाजाच्या पुनःर्घटनेचे कार्य यशस्वी रितींनें पार पडेल असें सर्वांसच वाटत होतें. पण इंग्रज पाणाड्याच्या हातून गंगेची सुटका करून तीच्या