जातिभेदाची इमारत उध्वस्त करण्यासाठी प्रथमतः बेटीबंदीवरतीं गदा घातली पाहिजे. - Page 208

१६४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

जातिभेद मोडण्यास पं. मालवीय जरी तयार नसले तरी स्पर्शास्पर्शभेद दूर करण्यात ते तयार असतां आम्ही तेवढ्या बाबीपुरता देखील त्यांचा उपयोग करून घेण्याऐवजीं हिंदुसंघटनेच्या कार्यांतून त्यांना खड्यासारखें निवडून टाका असें सांगण्यांत आमची चूक होत आहे असें कांही लोक म्हणतील, पण या बाबतींत आम्ही चुकत आहोंत असें आम्हांस मुळींच वाटत नाही. जातिभेद व स्पर्शास्पर्शमेद ते एकाच पदार्थाचे दोन प्रकार आहेत हें खरें ; दोहोंच्या बुडाशीं माणुसकीसंबंधी भिन्नभाव ही एकच गोष्ट असली तरी पण ब्राह्मणेतरांतली माणुसकी हीनकस तर अस्पृश्यांची मलीन, ही जातिभेद व स्पर्शास्पर्शभेद या दोहोंत मोठी तफावत आहें. यामुळें जातिभेद विसरून जाणें एकपटीनें कठीण असलें तर स्पर्शास्पर्शभेद विसरून जाणें लाखोपटीने कठीण आहे. वस्तुस्थिति अशा प्रकारची असतांना जातिभेद मोडण्यास ज्या पं. मालवीयांचा धीर होत नाही ते अस्पृश्यतानिवारणास कंबर कसतील या म्हणण्यावर आमचा मुळींच विश्वास बसत नाहीं. जातिभेद हा स्पर्शास्पर्शभेदापेक्षां कितीतरी जवळचा पल्ला आहे. परंतु ज्यास एवढ्या जवळचें मकान गाठतां येत नाहीं तो एवढ्या दूरची मजल मारील हें म्हणणें हास्यास्पद आहे. पडलंकेला जाणारानें आधीं लंकेला जाण्याची सिद्धता दाखविली पाहिजे.

बेटीव्यवहार सुरु झाल्याशिवाय जातीभेद मोडणार नाही, ही विचारसरणी जातीभेद मोडावा असें प्रतिपादन करणाऱ्या लोकांना मान्य आहे. पण आस्ते कदम म्हणून आधी जातिजातींत रोटीव्यवहार सुरू करावा असा त्यापैकी बऱयाच लोकांचा आग्रह दिसतो. तो झाल्यानें जातिभेद लयास जाईलच असें सांगतां येत नाहीं. खुद्द ब्राह्मण जातीत अशा अनेक जाति आहेत कीं, ज्यांत परस्पर रोटीव्यवहार होत असतो. पण अशा प्रकारचा रोटीव्यवहार आज अनेक वर्षांपासून चालत आला असतांहि त्यांच्यातील भेदाची भावना नष्ट झालेली दिसत नाहीं. यावरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे कीं, नुसता रोटीव्यवहार सुरू झाला तर तेवढ्याने जातिभेदाचे उच्चाटन होत नाहीं. कारण रोटीव्यवहार जरी सुरू झाला तरी बेटीव्यवहाराचा भेद शिल्लक राहून जातिभेदाच्या वृक्षाचा परिपोष व्हावयाचा तो होतोच. बेसुमार वाढलेलें Magid कांटेरी कुपण जर नको असेल तर त्याची छाटाछाट करून कार्यभाग होणार नाहीं. तें सर्व मुळापासून उपटून टाकलें पाहिजे. तशीच गोष्ट जातिभेदाची आहे. जातिभेदाच्या इमारतीचा पाया बेटीबंदीवरतींच उभारलेला आहे. रोटीबंदीवरतीं उभारलेला नाहीं. तेव्हां जातिभेदाची इमारत उध्वस्त करून टाकावयाची असेल तर प्रथमत: बेटीबंदीवरतीं गदा घातली पाहिजे.

७७७

आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. १ जुलै १९२७.