१६८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आस्ते आस्तें त्यांच्यांत दृढमूल झालेली आपल्यासंबंधीची समजूत घालविण्याचा प्रयत्न अस्पृश्य लोकांनी अगदी धीरे धीरे करावा, असे सांगणें हें होय. वर वर पाहाणारांना हा उपदेश मोठ्या कळकळीचा आहे असें वाटेल. पण जराशी आंत दृष्टि फेंकून त्यांच्या समग्र लेखांचे तात्पर्य ग्रहण करण्याचा प्रयत्न करतांच सुधारक म्हणवून घेणाऱ्या रा. पाणंदीकरांत व एखाद्या साध्या भोळ्या सनातन धर्मवाद्यात कांहींच फरक नाहीं असें दिसून येईल. धार्मिक मनोवृत्ती न दुखविण्यांचा त्यांचा उपदेश तर करून करून भागली आणि देवपुजेला लागली” अशाच प्रकारचा आहे. कां कीं, लोकांच्या धार्मिक मनोवृत्तीची एवढी काळजी बाळगणाऱ्या या गृहस्थानीं स्वतः पुनर्विवाह करून त्याच लोकांच्या मनोवृत्ति कां दुखविल्या ? कां विधवा-पुनर्विवाह हा धार्मिक मनोवृत्ति दुखविणारा विषयच नव्हें ? कां त्यांनी केलेला पुनर्विवाह हा एक शास्त्रसंमत विधि होय, असे लोक समजले ? कां आतां मुलेबाळें होऊन ती भार्यामृत झाल्यावर म्हातारपणी त्या कृत्याबद्दल उपरति होऊन प्रायश्चित्ताखातर म्हणून ते आतां इतरांना वरील प्रकारचा साळसूदपणाचा उपदेश करतात ? जो एका तोंडाने आपण अंत्यज आहोंत अशी भावना अस्पृश्य वर्गाने आपल्यांतून काढून टाकांवी असें सांगतो व त्याच तोंडीं अस्पृश्यांनी स्पृश्य वर्गाच्या शाळांतून आम्हांस शिक्षण मिळालें पाहिजे असा आग्रह धरतां कामा नये असें बजावतो त्याच्या ठायीं अस्पृश्यता निवारणाची कळकळ किती असेल याची जबरदस्त शंका येते. असें करा पण तसें नको, हें घ्या पण तें मागूं नका, येथवर या; पण पुढें जाऊ नका; अशा पण परंतुच्या पक्षांतर बोधक उभयान्वयी अव्ययाच्या जाळ्यांत गुरफटून गेलेला सुधारक खरा सुधारक नसून फक्त नामधारी सुधारक होय असेच म्हटलें पाहिजे. रा. पाणंदीकरांच्या वर्तनापासून बोध घ्यावयाचा तो हा कीं सुधारक म्हणून टेंभा मिरविणारे स्पृश्य लोक आणीबाणीचे वेळीं आपली पगडी फिरवितात आणि अस्पृश्यांची फसगत करतात.
आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. १ जुलै १९२७.