१७४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
पिटल्या आहेत. पण केसरीनें आपला राक्षसी आनंद व्यक्त करण्यापूर्वी मांगपरिषदेची दुसरी बाजू अवश्य वाचून पहावी, म्हणजे फूट कशी पडते, याचा सहज खुलासा होईल. आमची खात्री आहे की, जर स्पृश्य लोकांतील स्वार्थसाधु लोक अस्पृश्यांच्या वाटेस जाणार नाहींत, तर त्यांच्यांत कधींच फूट पडणार नाहीं. अर्थाचा अनर्थ करून, वस्तुस्थितीचा विपर्यास करून, एकमेकांची मनें एकमेकांविषयी कलुषित केल्यामुळेंच फाटाफूट होते. तसें होऊं नये म्हणून रा. AVIA आमची अशी सूचना आहे कीं, अस्पृश्यांवरील आपले प्रेम, खोटें असो वा खरें असो, आपण त्यांना आतां स्वतःचा संसार स्वतःच करण्यास मुभा द्या! आपलें प्रेम खोटें असेल, तर आपण दूर होण्यांत आपला प्रामाणिकपणा आहे. आपले प्रेम खरें असेल, तर दूर होणें हें आपले कर्तव्य आहे. मूल किती जरी लाडके असलें तरी त्यास सदोदित खांद्यावर घेतल्यानें तें पांगळें होतें. त्याला सोडून दिल्याने तें ठेचाळेल हें खरेंपण अखेर तें स्वत:च्या पायावर उभे रहावयास शिकेल, व स्वतंत्र होईल. तसें झालें तर रा. सकटांना कधी तरी अध्यक्ष होतां येईल. नाही तर परिषद रा. सकटांच्या जातवाल्यांची आणि अध्यक्ष रा. माट्यांच्या जातवाल्यांचे, असा गुलामगिरीचा शिरिस्ता नेहमींचाच पडून जावयाचा !
आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. १ जुलै १९२७.