आपलेपणाची साक्ष दे नाहीं तर पाणी सोड - Page 220

१७६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

मृतमांसाहार करणें, वगैरे वगैरे अनिष्ट चाली बंद करण्याबद्दल ठराव झालें होते. हे ठराव इतक्या लौकर अमलांत येतील, हें आम्हास स्वप्नांतसुद्धां वाटलें नव्हतें. पण यक्षिणीची कांडी फिरावी त्याप्रमाणे कुलाबा जिल्ह्यांत भाकर मागणें, व मृतमांसाहार करणे बंद झाले आहे. परंतु ज्या गावांत असा नवा कार्यक्रम सुरू झाला आहे त्या गांवांत अस्पृश्यांवर मोठा कहर उडून गेलेला आहे! कांही ठिकाणी त्यांना गावांतून येण्याजाण्याची बंदी झाली आहे, कांहीं ठिकाणी गावांतील लोकांनीं कट करून अस्पृश्यांकडे खंडानें असलेल्या जमिनी काढून घेण्यांत आल्या आहेत, अशापरी अस्पृश्यांना जेरीस आणून जुन्या हीन चालीची बोद त्यांच्या मर्जीविरुद्ध त्यांच्या पाठीवर लादण्यांत येत आहे. हा सर्व प्रकार पाहून वाचून कोणाहि सुज्ञ माणसास आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाहीं. अस्पृश्य वर्गांतील लोक स्वच्छ रहात नाहींत, उष्ट्या अन्नाची भिक्षा मागतात व मृत जनावरांचे मांस खातात यामुळें त्यांना अस्पृश्य मानण्यांत येतें असें स्पृश्य लोक नेहमींच मोठ्या दिमाखानें सांगतात, व अशा प्रकारचे अमंगलआचार सोडून दिल्याशिवाय अस्पृश्य लोकांस स्पृश्य मानतां येणार नाहीं असा उपदेश नेहमीं करण्यांत येतो. अस्पृश्य जनता जेव्हां अज्ञानांधकारानें अगदीं व्यापली होती त्यावेळी अशा प्रकारच्या उपदेशाची जरूरी होती. परंतु हल्लीच्या काळीं सर्व अस्पृश्य जनता खडबडून जागी झाली आहे. ज्या चालीरीतींच्या पायीं तीस हीनत्व पदरीं आलें आहे त्यांना एकदम फाटा देण्यास ती सिद्ध झाली आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट ही कीं, अस्पृश्य लोक ज्या स्पृश्य लोकांच्या सांगण्यावरुन आपली राहणी सुधारण्याचा प्रयत्न करीत आहेत तेच स्पृश्य लोक अस्पृश्य लोकांच्या कार्यांत विनाकारण कांटे पसरीत आहेत. अस्पृश्य वर्गातील लोकांनी 'आम्हांस अस्पृश्य कां मानण्यांत येते' असा प्रश्‍न केला असतां, “तुम्ही लोक अभक्ष्य खाता, अमंगल बोलतां व अस्वच्छ रहातां, यास्तव आम्ही तुम्हांस शिवून कसें घ्यावें ? अशा अडवणुकीच्या गोष्टी स्पृश्य लोक करतात आतां तेच अस्पृश्य लोक आपखुषींने आपले सर्व आचार-विचार बदलण्यास सिद्ध झाले असतां ते त्यांनीं बदलूं नयेत म्हणून त्यांच्याविरूद्ध आपल्यांत जेवढी कांहीं शक्ति असेल ती सर्व खर्ची घालून स्वतःच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या असहाय अस्पृश्यांची दैना करून त्यांना ठरविलेल्या पायरीच्या वर पाऊल टाकूं द्यावयाचें नाहीं, हा जो स्पृश्य लोकांनी निश्चय केलेला दिसतो तो पाहून कोणाही सुज्ञ माणसास आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाहीं जेथे केवळ अस्पृश्य लोक कोणाचें कांहीं नुकसान न करतां आपल्या बच्याच्या गोष्टी करण्यास झटत असतात, तेथे 'तुम्ही माजलांत' असें म्हणून हिंदु मामलेदाराने त्यांच्या तक्रारींची दाद घेऊं नये, हिंदू सावकारांनी

+ पाहा, परिशिष्ट क्रमांक १४.