१८० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
व म्हणालें असतें कीं, “ लोकमान्य ! तुम्हीं हें काय केलेंत ? राजकारणांत इंग्रज प्रभूविरुद्ध सांगितलेल्या तुमच्या मात्रा हे अस्पृश्य लोक समाजकारणांत स्पृश्य लोकांवर चालवूं पहात आहेत. “ बरें झालें कीं, लोकमान्यांच्या चेल्यांत पुरती अक्कल नाहीं. असती तर त्यांनीं लोकमान्यांच्या नांवानें खडे फोडले असते. तथापि, डॉ. उदगांवकरांच्या लेखांतील टवाळकीवजा मजकूर बाजूस टाकला तरी बहिष्कार योग सांगण्यांत आमचा अविवेक कसा झाला, हें डॉ. महाशयांनी कोठेंच दाखवून दिलें नाहीं. अस्पृश्य समाजास धर्म सोडण्याचा उपदेश '' आत्मधातकी “ आहे, असें डॉ. महाशय म्हणतात. पण नुसतें म्हणून काय उपयोग ? हिंदु समाजांत राहिल्यानें अस्पृश्य समाजांचे काय साधते, व बाहेर गेल्यानें काय Fed, याचा ऊहापोह जर त्यांनी केला असता तर आमची चूक आमच्या ध्यानांत आली असती. पण डॉ. महाशय करतात काय ? पदरी कांहीं अस्पृश्यता निवारणांचे पुण्य असतें तर तें जनतेपुढें त्यांनी मांडिलें असतें. महाडला जो अत्याचार झाला त्याबद्दल डॉ. महाशयांनी आपल्या हिंदु महासभेतर्फे निषेध केला असता, तर तो तरी आज सांगतां आला असतां. पण तेवढें हि करण्याची बुद्धि म्हणा किंवा हिम्मत म्हणा डॉ. उदगांवकरांनी दाखविली नाहीं. मग कोणत्या तोंडानें परधर्मात जाल तर Were, असें ते अस्पृश्यांना सांगतात, तें आम्हास कळत नाहीं. न जाणों, हिंदुमहासभेचे चिटणीस होणें हीच त्यांच्या अस्पृश्यतानिवारणाची साक्ष असेल, किंवा हिंदु धर्मांची महान तत्वें हीच आपली दौलत, असे समजून अस्पृश्य लोकांनी हिंदु धर्मावर सदासर्वदा फिदा रहावें, अशी त्यांची समजूत असेल. पण असल्या शुष्क गोष्ठींनीं किंवा नुसत्या शब्दांच्या कोटीक्रमानें आमची समजूत व्हावयाची नाही. डॉ. उदगांवकर व त्यांच्या विचाराचे जे लोक आहेत कीं, ज्यांना आम्ही धर्मातर करतों, या म्हणण्याची चीड येते, त्या सर्वांना आमचें असें निक्षून सांगणें आहें कीं, बाप दाखव नाहीं तर श्राद्ध कर, असें म्हणणाऱ्या भिक्षुकाप्रमाणें आपलेपणाची -साक्ष दे नाहीं तर पाणी सोड ही आमची मागणी आहे. तुमची नुसती नासकी बडबड आम्हांला नको आहे.
आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. १ जुलै १९२७.