४१
आमच्या जवळ उत्तर तयार आहे
मुंबईच्या डी. सी. मिशनच्या पुण्याच्या शाखेकडून आमच्याकडे प्रसिद्धीकरतां एक पत्र आलें आहे. ते रा. पाताडे, सुभेदार घाडगे व रा. गायकवाड या त्रिमूर्तीच्या सहीचें आहे. या पत्रास पुण्याच्या शाखेच्या ताब्यांत ज्या इमारती आहेत त्या इमारतींचा उपयोग राहण्याकडे होतो, अशी जी वारंवार टीका होते, त्या टीकेला उत्तर म्हणून लिहिलें आहे. हें पत्र छापण्यास आम्हास कांहींच हरकत नाहीं. परंतु त्याबरोबर आम्हास त्या पत्रांतील मुद्यांवर टीका केल्याशिवाय गत्यंतर नाहीं व टीकेनें मिशनचे जास्त नुकसान होण्याचा संभव असल्यामुळें आम्ही पत्र छापावयाचेंच मागे ठेवलें आहे. आम्ही टीकेला प्रवृत्त होऊं नये म्हणूनच कीं काय आम्हाला रा. पाताडे व सुभेदार घाटगे यांच्या सहीचें दुसरे बागुलबोवावजा पत्र आलें आहे. त्यांत महाडच्या दंग्याची हकीकत आम्ही प्रसिद्ध करणार आहोंत व त्यांत तुमच्या चुका आम्ही चवठ्यावर आणणार आहोंत असें लिहिलें आहे. रा. पाताडे व सुभेदार घाटगे यांना आमची अशी सूचना आहे कीं त्यांनी उभा केलेल्या बागुलबुवाला भिऊन आम्ही गप बसूं असें त्यांनीं स्वप्नांत देखील आणू नये. त्यांच्या पत्रावर आम्हीं टीका केल्यास त्यांना कांहीं हरकत नाही असें जर त्यांनीं आम्हास कळविलें तर आम्ही त्यांचे पत्र विलंब न लावितां प्रसिद्ध करू. महाडच्या बाबतीत संशोधन करून रा. पाताडे व सुभेदार घाडगे यांनी जे दोष शोधून काढले आहेत त्यांना आमच्या जवळ उत्तर तयार आहे हें या द्वय बंघुंनी ध्यानांत ठेवावे. त्यांचा रिपोर्ट प्रसिद्ध होण्याची आम्ही वाट पाहत आहोंत.
आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. १ जुलै १९२७.