दु:खांत सुख १९१
अशाच प्रकारचा उलटा सवाल आमच्यावर करण्यांत आला. ब्राह्मण Tr आमच्या हिताची एकादी गोष्ट केली नाहीं तर त्यांना दोष देण्याचा अधिकार आम्हांस नाहीं हें आम्ही कबूल करितो. तथापि ब्राह्मण वर्गावर आम्ही जो आरोप केला तो ब्राह्मण वर्ग हा सर्व जनतेचा पुढारी वर्ग आहे असें समजूनच केला होता. आमच्या मतें समाजाची रचना त्याचप्रमाणें त्याची उन्नति अथवा अवनति बऱ्याच अंशीं पुढारी वर्गाच्या शिकवणीवरच अवलंबून असते. पुढाऱ्यांच्या शिकवणींप्रमाणें समाजाला वळण लागतें. सबब समाजाच्या गुणावगुणाबद्दल पुढारी वर्गच जबाबदार धरला जातो. दरेक समाजांत कांहीं सामान्य आणि कांहीं सन्मान्य असे लोक असतात. तसेंच कांहीं समाज सामान्य व कांहीं सन्मान्य गणले जातात. ज्याप्रमाणें एखाद्या सामान्य व सन्मान्य अशा दोन व्यक्तीत कलह सुरू झाला तर तो कलह शमविण्याची जबाबदारी भांडणाऱ्या व्यक्तींपैकी जो अधिक सन्मान्य असतो त्याच्यावरच लादण्यांत येते. त्याच न्यायाने ब्राह्मण-ब्राह्मणेतरांत सुरू असलेल्या वादाचें तोंड बंद करण्याची जबाबदारी ब्राह्मण वर्गावरच येते. कारण हिंदु समाजाचें पुढारीपण फार प्राचीनकाळापासून ब्राह्मण वर्गाकडे आलेलें आहे, हें कोणासही नाकबूल करतां यावयाचें नाहीं. यास्तव या पुढारीपणाच्या अनुषंगें जी जबाबदारी ब्राह्मण वर्गावर येऊन पडते, ती जबाबदारी पार पाडण्याचा मन:पूर्वक प्रयत्न जर त्यांनीं केला नाही, तर त्यापासून त्यांच्यावर होणाऱ्या आरोपास तो वृथारोप आहे, असें त्यांस केव्हांही म्हणतां यावयाचे नाहीं. आपण हिंदु समाजाचे पुढारी आहोंत, ब्राह्मण वर्गास मान हवा असेल तर त्याने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे; व जबाबदारी नको असेल तर पुढारीपण सोडून शूद्रांत किंवा अतिशूट्रांत सामील झालें पाहिजे. याशिवाय त्यांच्यावरील दोषारोप टळणार नाहीं.
ब्राह्मणांना या बाबतींत आम्ही जबाबदार कां धरतों याचा एथवर खुलासा केला आहे. आतां याबरोबर दुसराहि असा प्रश्न उद्भवतों कीं, जर ब्राह्मण लोक ब्राह्मण्य विध्वंसनासाठीं पुढें आले नाहींत, तर दुसऱ्या कोणीच या बाबतीत कांहीच करू नये काय ? आमच्या मतें ब्राह्मण्यविध्वसंनाची जबाबदारी सर्वांवर जरी सारख्या प्रमाणात नसली, तरी कोणत्याही वर्गास या जबाबदारीतून सुटणें शक्य नाहीं. कारण ब्राह्मण्य हें सर्वव्यापी परमेश्वराप्रमाणें हिंदुस्थानांतील स्थिरचर सृष्टि व्यापून उरलें आहे. बरेचसे अस्पृश्य, असंख्य ब्राह्मणेतर व अगणित ब्राह्मण ज्ञानतः अज्ञानतः या ब्राह्मण्याचे उपासक आहेत. ब्राह्मण, ब्राह्मणेतर व अस्पृश्य या ब्राह्मण्यानें भरलेल्या गाडग्याच्या उतरंडी आहेत. अस्पृश्यांच्या