दु:खांत सुख - Page 236

१९२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

खांद्यावर ब्राह्मणेतर व ब्राह्मणेतरांच्या खांद्यावर ब्राह्मण, अशा या उतरंडी एकमेकांस लागून आहेत. यांत बिचाऱ्या अस्पृश्यांना दोघांचे ओझें सहन करावें लागत आहे. असें असल्यामुळें ब्राह्मण-ब्राह्मणेतरांपैकीं कोणीहि एकानें अस्पृश्यांच्या खांद्यावर बसून वाट चालण्याऐवजीं खालीं उतरून आपल्या पाऊलीं चालूं लागल्यास अस्पृश्यावरील हा दुहेरी भार हलका होणार नाहीं काय ? एकानें दुसऱ्याची वाट पाहण्याची कांहीं जरूरी नाहीं. ब्राह्मण लोक जर खालीं उतरण्यास बळकुबळीस आले, म्हणून ब्राह्मणेतरांनीं खाली उतरण्याचा ममताळूपणा दाखवूं नये काय ? ब्राह्मण्याच्या अमंगल गंगेचा उगम ब्राह्मण वर्गातूनच झाला असला, तरी तिच्या पुढें मोठें व खोल होत गेलेल्या पात्रांतून अनेक लोक वाहून जावयास लागले, तर उगमाचे लोक तिचा प्रवाह थांबवित नाहींत, एवढ्यावरून मध्यावर राहणाऱ्या लोकांनी देखील बांध घालूं नये, यास न्याय म्हणता येईल काय ? आमच्या ब्राह्मणेतरबंधूंनी या दृष्टीनें या प्रश्‍नाचा जितका विचार करावयास पाहिजे होता, तितका विचार केलेला दिसत नाहीं ही आमच्या मतें मोठ्या दुःखाची गोष्ट आहे. ब्राह्मणेतर पक्षाच्या तत्त्वांविरुद्ध एखादी गोष्ट ब्राह्मणेतर जनतेच्या हातून घडली, तर अशा गोष्टी ब्राह्मण लोक आम्हांस करावयास लावतात व आपण नामानिराळे होतात असा युक्तिवाद ब्राह्मणेतर पक्षाकडून नेहमींच करण्यांत येतो. असे होत असेल हें आम्हांस कबूल करण्यास कांही हरकत दिसत नाहीं. पण हरप्रसंगीं आम्हीं परप्रत्ययनेय आहोंत, दुष्कृत्याची जबाबदारी टाळण्याचा प्रकार आम्हास तरी मोठा विलक्षण दिसतो. नेहमीं दुसऱ्यांकडे बोट करून ' करता करविता ब्राह्मण वेगळाच आहे, मी फक्त निमित्ताला कारण आहें, ' असे म्हणून दरेक ब्राह्मणेतर अपराधी आपणास दोषमुक्त करून घेऊ म्हणेल तर सामान्य लोक त्याला वेड्यांत काढतील ; परंतु ब्राह्मणेतर पक्षातील लोकांस ही सबब लढविण्याची इतकी जबरदस्त संवय लागून गेली आहे कीं, या संवयीनें हा एवढा मोठा महाराष्ट्रातील बलाढ्य पक्ष अकर्तृत्वशील होतो कीं काय, याचा आम्हास मोठा धाक वाटूं लागला होता. व महाडच्या दंग्याच्या बाबतींत ब्राह्मणेतर पत्रांतून जी चर्चा झाली, ती वाचून तर आमची निराशा झाली होती, हें आम्हीं उघडपणें कबूल करतों. मारामारीत शेटजी भटजींनीं भाग घेतला होता, हा मुद्दा प्रस्थापित करण्यावरच ब्राह्मणेतर पत्रांच्या लेखनाचा कटाक्ष होता. आमच्या मतें या मुद्यावर भर देण्याचें कांहींच कारण नव्हतें. दंग्यांत कोणी भाग घेतला, हा प्रश्‍न आमच्या मतें अगदीं गौण होता व त्यावर रण माजवावयाची कोणाची इच्छा असल्यास आम्ही अजूनहि-खटल्यातील शेटजी भटजी आरोपी सुटले असतांहि-असें निक्षून सांगतों कीं, शेटजी भटजींनी या मारामारींत भाग घेतला होता. एवढ्याने जर ब्राह्मणेतर