दु:खांत सुख - Page 238

१९४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

परंपरागत भावनांना जुमानीत नाहीं “, "उद्दिष्ट गांठण्यासाठीं वीर मारुतीचे अनुकरण करून शंभर कोसांचें उड्डाण एकाच उडींत करण्याची महत्त्वाकांक्षा धरीत आहोंत “, “कित्येक शतकांच्या रूढींची तटबंदी एकदम सुरुंगाने उडवून देण्याचा अट्टाहास करीत आहांत.” वगैरे प्रलाप काढून कांहीं स्पृश्य लोक आम्हांस भेडसावीत आहेत, व आमच्या निश्चयापासून आम्हास परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण असल्या भेडसावण्याला आम्ही कदापि भीक घालणार नाहीं. नुसत्या शाब्दिक वादविवादानें किंवा ज्ञानाच्या WAR अस्पृश्यता निवारण होण्याची आम्हास आशा असती, तर आम्ही वरील बुद्धिवाद कदाचित्‌ कबूल केला असता. पण शस्त्रप्रयोगाशिवाय साध्या युक्तिवादाच्या किंवा ज्ञानाच्या मलमपट्ट्यांनी हा रोग हटणार नाही, ही गोष्ट अनुभवसिद्ध असतांना शस्त्र प्रयोग करण्यास मनाची निष्ठुरता न दाखविणे, यांत खरी कार्यक्षमता नसून मनाचा दुबळेपणा आहे, असें आम्हांस वाटतें. या दुबळेपणाच्या पापाचे आपण धनी होउं नये, अशी आमची मनोदेवता आम्हास आज्ञापित असल्यामुळे आम्ही महाड येथे पुनः “ चवदार “ तळ्यावर जाण्याचा शक्य तितक्या लौकर उपक्रम करणार आहोंत. महाड येथील हा भावी सत्याग्रह कसा करावा, याविषयीं रा. जवळकर व जेधे या उभयतांनीं जें मत प्रतिपादन केलें आहे, तें मत आम्हास ग्राह्य आहे. तरी पण एका महत्वाच्या गोष्टींत त्यांचा आणि आमचा मतभेद आहे, हें आम्हास नमूद करणें जरूर वाटतें. रा. जेधे व जवळकर यांनी अशी अट घातली आहे कीं, या सत्याग्रहांत “कोणत्याहि ब्राह्मण जातींतील गृहस्थास सामील करण्यांत येऊ नये.” ही अट आम्हांस केव्हांच मान्य करतां येणार नाही. आम्ही ब्राह्मणांच्या विरुद्ध नाहीं. ही गोष्ट आम्ही जाहीर करूं इच्छितो. आमचा कटाक्ष ब्राह्मण्यावर आहे. ब्राह्मणलोक आमचे वैरी नसून ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत, असें आम्ही समजतों. या भावनेने प्रेरित झाल्यामुळे ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणेतर हा आम्हाला दूरचा वाटतो व ब्राह्मण्यरहित ब्राह्मण आम्हास जवळचा वाटतो. आमच्या मनाची ठेवण अशा तऱ्हेची असल्यामुळे आम्ही योजिलेल्या सत्याग्रहात दरेक व्यक्तीस मुभा आहे. मग ती व्यक्ति, कोणत्याहि जातींतील असो. ज्यास ब्राह्मण्य नको असेल, तोच या खटाटोपींत पडेल. येथें निवडानिवड करण्याची आम्हांस कांही जरुरीच दिसत नाहीं.

t पहा, परिशिष्ट-१७

अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. १ जुलै १९२७.

डब्ल्यू-२०७३-१३ ब