व्यक्तीला जरूर ते स्वातंत्र्य .. . . . सारखेच अनिष्ट होतात १९९
ब्राह्मण-अब्राह्मण या उभय पक्षांच्या दृष्टीने मोठी खेदाची गोष्ट होती. अशा परिस्थितींत कांही ब्राह्मण लोकांनींच हें काम अंगावर घेऊन ब्राह्मण रोग्यास दीर्घायु करण्याचें हें जें देशकार्य आरंभिले आहें, त्याबद्दल सारी अब्राह्मण जनता त्यांची सदैव ऋणीच राहील. पण दुसऱ्याहि एका दृष्टीनें हा उद्योग स्तुत्य आहे असें आम्हांस वाटतें. समाजाच्या अस्तित्वासाठी समाजबंधने जरी आवश्यक असलीं, तरी व्यक्तीच्या परिपोषाला अशी बंधने बाधक होतात. जोंपर्यंत समाजाचे मत आणि व्यक्तींचे मत यांत एकतानता असते. तोंपर्यंत लढा उत्पन्न होत नाही. परंतु जेव्हां समाजाच्या मतांत आणि व्यक्तीच्या मनांत भिन्नता दिसून येते तेव्हां ओढाताण सुरू होते, आणि व्यक्तीला जरूर तें स्वातंत्र्य जर प्राप्त झालें नाही तर त्याचे नैतिक परिणाम उभयतांवर सारखेच अनिष्ट होतात. त्यांतल्या त्यांत सामाजिक बंघनानें व्यक्तीचा कोंडमारा झाला म्हणजे ज्या गोष्टी मनापासून कराव्याशा वाटतात, परंतु त्या समाज उघडपणें करू देत नाहीं, त्याच गोष्टी मनुष्य छपवून करावयास लागतो. अशा प्रकारची संवय माणसांस एकदां जडली म्हणजे तो सहजच दांभिक वृत्तीचा, दुहेरी वर्तनाचा, असत्य बोलणारा, अप्रामाणिक मनुष्य बनतो. ब्राह्मण समाजाची बंधनें विशेष कडकडीत असल्यामुळें अशा प्रकारच्या लोकांची पैदास त्या समाजांत विशेष प्रमाणांत होते. वरून शाकाहार करणारे पण चोरून दररोज मांसाहार करणारे पापी लोक ब्राह्मणवर्गात असंख्य सांपडतील. या उपहारगृहानें अशा लोकांची संख्या कमी होण्यास मदत होईल म्हणून त्याच्या चालकांचे आभार मानणें इष्ट आहे.
ooo
आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. १५ जुलै १९२७.