आप घरी बाटा, बाप घरींही बाटा | - Page 258

२१४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

व शेवटच्यास पहिला दिसत नाहीं. त्यांतल्या त्यात ध्यानांत ठेवण्यासारखी गोष्ट ही कीं मुसलमान लोक जे कांही थोडक्या दिवसांपूर्वी सर्वांच्या नव्हे अस्पृश्यांच्याहि पिछाडीस होते त्यांनीं आज इतकें अंतर छाटले आहे कीं नुसते मराठ्यांना व अस्पृश्यांना मागें टाकलें आहे असेंच नव्हे तर ब्राह्मणांना देखील ते गांठीत आले आहेत. तीन मागासलेल्या वर्गापैकीं एकानें आणि तोहि गाढ निद्रेत घोरत पडत असलेल्या वर्गाने खडखडून जागे व्हावें व घोडदौड करून सर्वांस मागें टाकावें हा आश्चर्यकारक परिणाम कसा घडला हा प्रश्‍न विचारांत घेण्यासारखा आहे. मुसलमान लोकांच्या शिक्षणप्रगतीर्चे मुख्य कारण म्हणजे सरकारनें दिलेल्या विशेष सवलती हेंच होय. या सवलती मुसलमानवर्गास देण्यात आल्यामुळे वरिष्ठ हिंदु सरकारवर नेहमी नाराज असतात. हे त्यांचे वर्तन आम्हास पसंत नाहीं. ज्या कारणाच्या आधारावर मुसलमान वर्ग आपणा- करितां विशेष सवलती सरकारजवळ मागतो तीं कारणें नादानपणांचीं असतील. आम्ही हिंदुस्थानचे देवडीवाले आहोंत, आम्हास खूष ठेवा, नाहीं तर शत्रुला आंत सोडूं. आम्ही मोगल बादशाहीचे ऐतिहासिक अवशेष आहोंत, यास्तव आमच्या म्हणण्याला सरकारनें विशेष किंमत दिली पाहिजे वगैरे आधारांवर मुसलमान लोकानीं मागण्या मागणें हें घमेंडखोरीचें लक्षण आहे. तथापि मुसलमानांना ज्या सवलती देण्यांत आल्या त्या केवळ बाजीरावानें मस्तानीवर फिदा होऊन दिलेल्या देणग्यांप्रमाणे अस्थानीं आहेत असें म्हणतां यावयाचें नाहीं. या सवलतीच्या धोरणाला विरोध करणाऱ्या वर्गाचें असें म्हणणें आहे कीं, सवलती देणें हा निव्वळ पक्षपात आहे. सरकारनें सर्व प्रजेला सारखें वागवावें, आंगा जांघाचें करूं नये. हा उपदेश दिसावयाला यथार्थ दिसतो. पण सर्वच परिस्थितींत तो सारखाच हितकारक होईल असें म्हणता येणार नाहीं. एका परिस्थितींत न्याय करावयाचा झाला तर तोच उपदेश अंमलांत आणावा लागेल. पण निराळ्या परिस्थितींत तो जर लागू केला तर न्यायाच्या ऐवजीं अन्याय होईल. दोन माणसें सारखी सुदृढ असतील तर एकाला मलिदा व दुसऱ्याला कोंडा देणे केव्हांच रास्त होणार नाही. पण एक रोगी व दुसरा निरोगी असला तर निरोग्याला कोंडा व रोग्याला मलिदा हीच व्यवस्था प्रशस्त ठरेल. म्हणून आम्ही म्हणतो कीं, जेथें सर्व लोक सारख्या सपाटीवर असतील तेथें त्यांना सारख्या रीतीने वागविण्यास हरकत नाहीं. नव्हे तेंच न्याय्य होईल. पण जेथे मुळांतच लोक असमान आहेत तेथें त्यांना समानतेनें वागविणें अन्याय होणार आहे. यास्तव प्रजेतील सर्व जनांना सारख्या सपाटीवर आणणें ही जर सरकारच्या धोरणांची दिशा असेल तर जे वर्ग सपाटीच्या खालीं' असतील त्यांना विशेष सवलत देऊन वर आणणें हयांतच न्याय आहे. म्हणून मुसलमान

†पाहा, परिशिष्ट क्रमांक १९.