आप घरी बाटा, बाप घरींही बाटा | - Page 259

आप घरी बाटा, बाप घरीहि बाटा ! २१५

वर्गाला सरकारनें ज्या सवलती दिल्या त्याबद्दल आम्हांस विषाद वाटत नाहीं. विषाद वाटतो तो येवढ्यासाठीच की मागासलेल्यांपैकी मुसलमान तेवढे सरकारला दिसले. मराठा वर्ग व अस्पृश्य वर्ग यांच्या अस्तित्वाची बूज सरकारला कां झाली नाहीं ? मागासलेपणामुळे जर सवलती द्यावयाच्या तर जे जास्त मागासलेले त्यांना जास्त सवलती मिळावयास पाहिजे होत्या. एकट्या मुसलमानांना सरकारनें उरावर घेऊन नाचावें व त्यांच्याहिपेक्षां मागासलेल्या वर्गांकडे डाव्या डोळ्यानें देखील पाहूं नये ही सरकारच्या प्रजापालनाची हातोटी विलक्षण नाहीं असें कोण म्हणेल ? आतां सवलतींचा प्रश्‍न बाजूस ठेवला तरी शिक्षणाच्या बाबतींत सरकारला कर्तव्य म्हणून कांही करणें प्राप्त आहे किंवा नाहीं याचाच विचार करावयाचा आहे.

उपासमारींने शरिराचें पोषण कमी झाल्यास माणूस हीनबल होऊन अल्पायुषी होतो. तसेंच शिक्षणाचें अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणीं दुसऱ्याचा गुलाम बनतो. अर्थात्‌ मुलांच्या शरिराची व बुद्धीची शक्य तेवढी चांगली जोपासना करणें प्रत्येक आईबापाचे कर्तव्य आहे. परंतु बऱ्याचशा लोकांच्या हातून शिक्षण देण्यांचें महत्वाचे कर्तव्य पार पडत नाहीं. पोट हें दरेकाच्या मागे लागलेले असतें व तें भरण्यास अनेक लोक अनेक प्रकारचे व्यवसाय करीत असतात. एकदां एक व्यवसाय पिढीजात झाला म्हणजे तोच पुढे चालू होतो; त्यात सहसा बदल होत नाहीं. या अनेक व्यवसायांपैकी शिक्षण हा एक व्यवसाय आहे व ज्या जाती त्यांत पडतात त्यांचा तो धंदा होऊन बसतो. ब्राह्मण लोक शिक्षण घेतात व इतर वर्ग घेत नाहींत याचें तरी कारण हेंच कीं शिक्षण हा जसा ब्राह्मण जातीचा धंदा झाला आहे तसा तो इतर जातींचा झालेला नाही. तुम्ही शिक्षण घ्या म्हटलें असतां आम्हांला काय ब्राह्मण व्हायचें आहे, असें जे अब्राह्मण लोकांकडून उत्तर मिळतें त्यांचें इंगित यांतच आहे. शिवाय अब्राह्मण लोकांत मुलांबाळांना शिक्षण देण्याची मनापासूनची इच्छा असली तरी ती सहज सफल होत नाहीं. मुलाला शाळेत घातलें तर त्याचा दुहेरी बोजा आईबापांवर पडतो. एक तर मुलगा शाळेत गेला तर त्याच्यापासून होणारी कमाई बंद होते व तो आईबापांच्या अंगावर पोस पडतो. दुसरें त्याच्या शिक्षणासाठी होणारा खर्च त्याच्या आईबापांस सोसावा लागतो. म्हणजे शिक्षणाच्या पायीं कमाईची आयात बंद होऊन खर्चाच्या निर्गतीला मात्र सुरवात होते. यामुळे हातावर कमवून जीवीत कंठणाऱ्या आईबापांना खर्चाचा बोजा झेपत नाहीं व म्हणून त्यांची प्रजा पिढ्यान्‌पिढ्या अज्ञानाच्या गर्तेत खितपत पडलेली असते. पण ही अवस्था कितीही क्षम्य असली तरी ती विधातक आहे यांत शंका नाही. कारण व्यक्ति स्वातंत्र्यांची आवश्यकता जर मान्य असेल तर दरेक