२१६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
व्यक्तीच्या ठायीं आपलें स्वातंत्र्य रक्षण करण्याची शक्ती उत्पन्न होणें अत्यंत जरूर आहे व ती शिक्षणाशिवाय उत्पन्न होऊं शकत नाहीं. या कारणास्तव दरेक सुधारलेल्या राष्ट्रात प्रजेला सुशिक्षित करण्याची जबाबदारी सरकारला आपल्या अंगावर घेणें प्राप्त झालें आहे. हिंदुस्थानांत मात्र ही जबाबदारी पत्करण्याचे भरीस सरकार पडलें नाहीं. प्रजेच्या वित्ताचें व जीविताचें संरक्षण एवढेंच काय तें आपलें कर्तव्य आहे, यापरतें दुसरें कांही नाहीं अशी आमच्या इंग्रज सरकारनें आपली ठाम समजूत करून घेतली होती. यास्तव कोणी कोणावर चाल करुन त्याच्या शरिराला प्रत्यक्षपणे दुखापत करू नयें अगर अप्रत्यक्षपणे त्यास अपाय होईल असें करू नये, ज्यास जिकडे जाणें असेल तिकडे त्यास जावयास कोणी प्रतिबंध करू नये; कोणी कोणाचें वित्त लबाडीनें हरण करू नये; ज्यांचें धन तो त्याचा स्वामी, त्यानें त्याचें वाटेल तें करावें वगैरे व्यवस्था नियमबद्ध करणारे पीनलकोड, क्रिमीनल प्रोसीजर कोड, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचा कायदा वगैरे कायद्याच्या राशीच्या राशी करून आमचें इंग्रज सरकार स्वस्थ हात आंखडून बसलें होतें. १९१० सालीं प. गोपाळ कृष्ण गोखले यांनीं सरकारला शिक्षणाचे बाबतींत हालवून पाहण्याचा प्रयत्न केला. पण या बाबतींत बसकटीस आलेलें सरकार कांही केल्या उभें राहिना. याचा परिणाम असा झाला की, ज्या जातींना शिक्षणाची गोडी नव्हती त्या जाती अशिक्षितच राहिल्या व व्यक्तिस्वातंत्र्यांचे संरक्षण करण्यासाठी मोठमोठाले कायदे ठोकठाकून केले असतांही अशिक्षित जनतेला सुशिक्षित वर्गाच्या लफंग्या व लोभी कारस्थानापासून सुटका करुन घेणें दुरापास्त झालें. शेतकरी कायद्यासारखा कायदा शेतकऱ्यांच्या बचावासाठी सरकारला पास करणे भाग झालें, हा सरकारचा व्यक्तिस्वातंत्र्यांचे संरक्षण करण्याचा उपाय कसा फोलकट आहे याचा सरकारविरूद्ध सरकारनेंच दिलेला पुरावा आहे.
१९२० साली राजकीय सुधारणेचा कायदा पास झालां. तेव्हांपासून इतर इलाख्याप्रमाणें या इलाख्यांतही लोकशाहीच्या काळास सुरूवात झाली. तेव्हां आतां तरी शिक्षणाचे बाबतीत आपलें कर्तव्य सरकार पार पाडील अशी आशा होती. कारण लोकशाहीच्या काळांत शिक्षणाशिवाय मुळीं चालणेंच शक्य नाहीं; दरेक राष्ट्रांत नानाविधप्रकारचे उद्योग व व्यवहार परस्परांत चालले असतात. या व्यवहारांत कोण कोणाला बुडवील, कोण कोणाला रसातळाला नेईल, कोण कोणाचा गळा कापून त्याच्या स्वातंत्र्याला धोका करील याचा नेम नाही. व असें जर झालें तर लोकशाही ऐवजी अमीरशाहीच होईल. हल्ली एका विवक्षित प्रकारच्या संघटनेला लोकशाही असें नांव देण्याचा प्रघात पडला आहे. पण लोकशाहीचा हा अर्थ अगदी संकुचित आहे. जेथे दरेक व्यक्ति परस्परांत व्यवहार करतांना आपल्या तोलानें वागूं शकते व दुसऱ्याच्या जाळ्यांत