अस्पृश्यता काढून टाकणे ही सुधारणा, न्याय, भूतदया व राष्ट्रेक्य यांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक. - Page 265

अस्पृश्यता काढून टाकणे . .... यांच्या दृष्टीनें अत्यंत आवश्यक २२१

आहे. अशा माणसांचा हिरमोड करावा असें श्री जवळकर हेहि म्हणूं शकणार नाहींत. ब्राह्मणांमुळें कार्याचा बिघाड होईल अशी भीति बाळगायवाची तर तशी भीति अनेक ब्राह्मणेतरांच्या व खुद्द बहिष्कृत वर्गीयांच्या बाबतींतहि बाळगावीं लागेल. आम्हांला चोरून छपून कांही करावयाचें नाहीं. सर्व गोष्टी आम्हीं उघडच करणार आहों. त्याअर्थी ब्राह्मणांविषयी किंवा दुसऱ्या कोणाविषयीं भीति बाळगण्यांचें आम्हांस कारण नाहीं. कांही सोंवळे ब्राह्मण किंवा ब्राह्मणेतर आमच्या स्पर्शाचा विटाळ मानोत, परंतु सद्धेतूंनी प्रेरित असलेल्या ब्राह्मणांच्या किंवा ब्राह्मणेतरांच्या साहाय्याचा आम्हीं तरी विटाळ मानीत नाही. आमच्या पवित्र कार्यात साहाय्य करावयाला तत्त्वनिष्ठेनें जे पुढे येतील त्यांचे आम्ही आभारच मानूं. आमच्याकडे आणखीही कित्येक सद्गृहस्थांनी पत्रें पाठवून सत्याग्रहांत भाग घेण्याची इच्छा प्रदर्शित केलेली आहे. अस्पृश्य वर्गातील शेंकडो लोक फक्त सत्याग्रहाची तारीख जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. योग्य वेळीं महाडला जाणाऱ्या मंडळीचीं नांवें प्रसिद्ध करण्यांत येतील.

श्री. घोरपडे यांनी आपल्या पत्राच्या शेवटी बहिष्कृतांच्या तर्फे सुरू होणाऱ्या सत्याग्रहाच्या चळवळींत सामील होऊ इच्छिणाऱ्या मंडळींसाठी शपथपत्रिका तयार करण्याच्या बाबतींत जी सूचना केली आहे तिच्याविषयीं दोन शब्द लिहिण्याखेरीज या विषयाची रजा घेणें योग्य होणार नाहीं. श्री. घोरपडे यांनी शपथपत्रिकेंत घालावयाची जीं कलमें सुचविली आहेत ती तत्त्वदृष्ट्या बरोबर आहेत यांत मुळीच शंका नाहीं. जातिभेद व अस्पृश्यता हे दोन्ही प्रश्‍न परस्पर संलग्न आहेत. जातिभेदाचा प्रश्‍न अस्पृश्यतानिवारणाच्या प्रश्‍नापासून पूर्णपणें अलग ठेवता येणें शक्‍य नाहीं, हें आम्हास सर्वस्वी मान्य आहे. तथापि, व्यवहारसुलभतेच्या दृष्टीनें विचार करतां, सत्याग्रहाची चळवळ अस्पृश्यतानिवारणापुरतीच मर्यादित करणें इष्ट आहे असें आम्हांस वाटतें. अस्पृश्यता कादून टाकणें ही सुधारणा न्याय, भूतदया व राष्ट्रैक्य यांच्या दृष्टीनें अत्यंत आवश्यक आहे असें ज्यांचे मत आहे अशा सर्व लोकांना बहिष्कृतांतफे व त्यांच्याबरोबर सत्याग्रहांत सामील होण्यास कांही हरकत नसावी. उदाहरणार्थ, महात्मा गांधींच्या मतांसारखीं ज्यांचीं मतें आहेत अशा लोकांना श्री. घोरपडे यांनीं सुचविलेल्या शपथपत्रिकेवर सही करणें कदाचित्‌ कठीण जाईल. पण त्याकरितां तशा मंडळीची सहानुभूति व सहाय्य धुडकावून लावणें योग्य होणार नाहीं. त्यांचे विचार तत्त्वदृष्ट्या चुकीचे असतील, परंतु तेवढ्यासाठी त्यांच्यावर बहिष्कार घालणे चुकीचे होय. सत्याग्रहासारखी चळवळ विशिष्ट बाबींवरच भर ठेवून चालवावयाची