५३
आमचे टीकाकार
' बहिष्कृत भारता ' च्या धोरणावर निरनिराळ्या लोकांकडून निरनिराळ्या प्रकारची टीका करण्यांत येत आहे. या सर्व टीकाकारांना उत्तरें देणें आणि सर्वांचे समाधान करणें आम्हांस शक्य नाहीं, हें आम्ही जाणून आहों. तथापि, आमच्या टीकाकारांपैकी जे कोणी प्रामाणिक टीकाकार असतील, ज्यांचा केवळ गैरसमज झालेला असेल, त्यांच्याकरितां आमच्या धोरणासंबंधांनें थोडाबहुत खुलासा करावा असें आम्हांस वाटतें. आमच्यांतलेच, गोताला काळ होणारे कांही कुन्हाडीचे दांडे किंवा ' अस्तनींतले निखारे ' असून ते आपल्या मनास मानेल त्याप्रमाणें आमच्याविषयीं गैरसमज पसरवीत असतात. बहिष्कृत वर्गातल्या कित्येक लोकांनी आपली बुद्धि अस्पृश्यतानिवारणाची वरपांगी कळकळ दाखविणाऱ्या लोकांपाशी गहाण ठेवली आहे. कित्येकांना आपली आजपर्यंतची नामधारी पुढारीपणासंबंधाची वतनदारी आमच्या धडाडीच्या धोरणामुळे गेली त्यामुळें वैषम्य वाटत आहें. कित्येकांना वैयक्तिक असूयेनें इतकें पछाडलें आहे कीं, अस्पृश्यतानिवारण होवो किवा न होवो, आज होवो किंवा कालांतराने होवो, पण डॉ. आंबेडकर यांना हाणून पाडलें कीं मिळविली, या धोरणांनें त्यांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा चालविली आहे. आंबेडकर किंवा ' बहिष्कृत भारत ' यांनी दिलेलें मत योग्य असो किंवा अयोग्य असों, त्यांचें धोरण परिणामी बहिष्कृत वर्गांना फायदेशीर असो किंवा नसो, त्याविषयी नापसंती दाखवावयाची आणि उभयतांविषयीं बहिष्कृत समाजांत व इतरत्र गैरसमज पसरवून द्यावयाचे, मग बहिष्कृतांची
चळवळ ठार झाली तरी हरकत नाहीं, येथपर्यंत वैयक्तिक असूयेची व द्वेषाची मजल गेली आहे. अशा टीकाकारांचे समाधान आम्हीं काय करणार ? परंतु
त्यांच्या टीकेमुळें होणाऱ्या भोळ्या व गैरमाहीत लोकांचा गैरसमज टाळता येईल तर टाळावा असें आम्हांला वाटणें स्वाभाविक आहे. आमच्या अंगीकृत कार्याला अडथळे येऊ नयेत, याकरितां आमच्यावर चाललेल्या टीकेचा कायदेशीर मार्गानींहि बंदोबंस्त करणें आम्हांस भाग पडलें तर त्याबद्दल विचारी लोक आम्हांला दोष देणार नाहींत याविषयी आमची खात्री आहे. बहिष्कृत वर्गातले कित्येक लोक आमच्यावर स्वजातिपक्षपातित्वाचा आरोप करीत असतात. या आरोपाचे