२२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
पुष्कळ असेल, कांही उदात्त तत्त्वेंहि असतील, परंतु व्यवहारांत जोपर्यंत तें उच्च तत्वज्ञान व ती उदात्त तत्वें दिसत नाहींत तोंपर्यंत त्यांची किंमत कोण कितीशी मानील ? पुस्तकांतल्या गोष्टी पुस्तकांत, किंवा 'पुराणांतली वांगी पुराणांत' हा न्याय प्रत्यक्ष आचरणांत जोंपर्यंत दिसून येत आहे तोपर्यंत हिंदुधर्मातल्या तत्वज्ञानावर भाळलेल्या लोकांनाहि त्या धर्माविषयींचा अर्थात त्या धर्माच्या व्यावहारिक स्वरुपाचा थोडा बहुत वीट आल्याखेरीज राहणें शक्य नाही, त्यांतहि ' ज्या वर्गाना त्या धर्माचें व्यावहारिक स्वरुप पदोपदी नडतें व जाचतें त्या वर्गातल्या लोकांना एकदांचा या बाबतीत सोक्षमोक्ष करून घ्यावा असें वाटावें हे अगदीं स्वाभाविक आहे.
धर्मासाठी माणूस कीं माणसासाठी धर्म ?
हा प्रश्न जरूर विचार करण्यासारखा आहे. नीतिशुद्ध आचरण ठेवण्याच्या जबाबदारीच्या दृष्टींने धर्मासाठी माणूस आहे. आणि एकंदर समाजाच्या हिताचा प्रश्न जेव्हां उपस्थित होतो तेव्हांहि धर्मासाठी माणूस आहे असें म्हणतां येईल. परंतु धर्माच्या नांवावर खपणाऱ्या अधर्मासाठीं, विशिष्ट वर्गाच्या गुलामगिरींत खपण्यासाठीं, पिढ्यान्पिढ्या अन्याय व जुलूम सोसण्यासाठीं माणसाचा जन्म आहे किंवा एकाद्या वर्गाचें अस्तित्व आहे असें मात्र केव्हांहि म्हणतां येणार नाही. माणसासाठीं धर्म आहे, म्हणजे प्रत्येक मनुष्याला आपली ऐहिक उन्नति नीतिमार्गानें चालून संपादण्याला धर्माचें साहाय्य झालें पाहिजे. कोणत्याहि माणसाच्या 'अभ्युदया' ला त्याचा. जन्म अमुक एका कुळांत झाला म्हणून धर्मांच्या नांवावर आडकाठी येतां कामा नये. कित्येक धार्मिक म्हणविणारे लोक अस्पृश्य मानलेल्या वर्गावरील अन्यायांवर सारवण घालतांना असा प्रश्न करितात कीं, “अस्पृश्य मानलेल्या वर्गांत चोखोबामहाराज t, रोहिदास महाराज यांच्यासारखे जे साधुपुरुष झाले त्यांना आम्ही स्पृश्यवर्गीय लोक पूज्य मानीत नाहीं काय ? आमच्या धर्मात त्या साधुपुरुषांना आम्ही उच्च स्थानच देत नाहीं काय ?” गोष्ट खरी आहे. परंतु चोखोबा रोहिदासांसारखी माणसें कोणत्याहि समाजांत वारंवार किंवा शेंकड्यांनी उत्पन्न होत नसतात. तशा अपवादभूत व्यक्तींची उदाहरणें देणें म्हणजे वादाचा मुख्य मुद्दा जाणून बुजून टाळण्याचा प्रयत्न करणेंच होय. अस्पृश्य वर्गातले लोक तरी सर्व ब्राह्मणांना किंवा स्पृश्यांना कोठें सारखेच अनुदार म्हणतात ? एकनाथ महाराजांविषयी आधुनिक विचारांच्याहि कोणत्या बहिष्कृताला अत्यंत आदर वाटत नाही ? चोखोबामहाराजांच्या अस्थि शोधून काढणाऱ्या नामदेव महाराजांच्या अंतःकरणाला आकुंचित विचारांचा विटाळ झालेला नव्हता असेंच प्रत्येक बहिष्कृत समजतो. चोखोबा
† पाहा, परिशिष्ट क्रमांक २१.
डब्ल्यू-२०७३-१५ ब