२२८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
obstinacy of the refusal to admit any kind of equality of capacity or of rights. His education and his free use of his faculties are discouraged and opposed. In low minds this complex of prejudies and resistances breeds open contumely, vilification of the slave-race, agitation against
any concession to it, and acts of outrage and violence.
आफ्रिकन लोक व या देशांतील बहिष्कृत वर्ग यांच्या दरम्यान कांही बाबतींत भेद आहेत. पहिली गोष्ट ही की, निग्रो वगैरे आफ्रिकन लोक हे युरोपियन लोकांपेक्षा मानववंशदृष्ट्या जसे भिन्न आहेत तसे या देशांतले अस्पृश्य मानलेले लोक स्वतःला उच्च वर्णीय मानणाऱ्या या देशांतल्या लोकांपासून मानववंशशास्त्रदृष्ट्या भिन्न नाहींत. दुसरी गोष्ट ही कीं पाश्चात्य देशींय लोकांनी जो गुलामगिरीचा जुलूम केला त्याला धर्माचा कांही आधार त्यांनी घेतला नाही. परंतु इकडे समाजशास्त्र व धर्मशास्त्र हीं एक असल्यांमुळे राजरोस धर्माच्या आधारावर अस्पृश्यतेची गुलामगिरी निर्माण करतां आली. धर्मामध्ये हीं बाब घुसडली गेल्यांमुळे ती वज्रलेप बनली. एक तर तिनें उच्चवर्णीय म्हणविणाऱ्या लोकांच्या मनांतली न्यायविषयक भावना नष्ट करून टाकली आणि खुद्द अस्पृश्यांचीहि विचारशक्ति नाहींशी केली. धर्माच्या दडपणाखाली बहिष्कृतांचा स्वाभिमान नष्ट झाला. त्यांना आपल्या माणुसकीच्या हक्कांचा विसर पडला. ज्या जातीचा स्वाभिमानच नष्ट झाला ती जात आपलें डोकें कसे वर काढणार? अर्थात् बहिष्कृतांच्या उन्नतीचा मार्गच मुळी खुंटला. लॉर्ड
ऑलिव्हीयर म्हणतात :- “ No race can be raised by destroying its self- respect.” (स्वाभिमान नष्ट करून कोणत्याहि जातीची उन्नति करतां येणार नाही). धर्मावर आमचा कटाक्ष आहे तो याचसाठी. धर्माने समाजरचनेच्या बाबतींत लुडबुड केली नसती, धर्माच्या नांवावर खपणारें निर्बंध आम्हांला जाचक झाले नसते, तर आम्ही तरी धर्मावर का रोष केला असता ? आम्हांला शांतिपाठ शिकविण्याचा आव आणणाऱ्या
आमच्या टीकाकारांना आमचा सवाल
असा आहे कीं, तुम्ही जर एकाद्या बहिष्कृत-अस्पृश्य मानलेल्या जातींत जन्मलां असतां तर तुम्हीं असेंच शांतिब्रह्म राहिलां असतां काय ? तुम्हांला हिंदुधर्माविषयींच्या प्रेमाचा असाच उमाळा आला असता काय ? दक्षिण आफ्रिकेत हिंदी लोकांना तुच्छतेने वागविण्यांत येतें म्हणून तुमच्या अंगाचा संताप होतो. या देशांत यूरोपियन व युरेशियन लोकांसाठी निराळे आगगाडीचें डबे राखून ठेवले तर तें तुम्हांस खपत नाही. फार काय पण एडिंबरो येथील हिंदी लोकांना तेथल्या