२३० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
कीं जादूने चमत्कार व्हावा त्याप्रमाणे आमची अस्पृश्यता नष्ट होते. अर्थात खिस्ती किंवा मुसलमानधर्मात पावनशक्ति आहे, ही गोष्ट आम्हांस स्पष्ट दिसत असतांहि आमच्या वाडवडिलांचे हिंदुधर्मावरील प्रेम-त्यांची भोळी श्रद्धा कां म्हणाना लक्षांत आणून हिंदुधर्मात राहण्यासाठी आम्ही धडपड करीत आहों. बाकी हिंदु लोक हे आपले धर्मबंधु आहेत असे आम्हांस वाटत आहे म्हणूनच देवळांचे दरवाजे आम्हांला खुले करून देवदर्शन घेऊं द्या, आमच्यावरील अस्पृश्यतेचा बहिष्कार काढा, असें आम्हीं म्हणत आहों. तुमचा आमचा धर्म जर एक तर त्याच्यावर तुमच्याइतकाच आमचाहि हक्क आहे. त्या हक्काची अंमलबजावणी होऊं शकत नाहीं अशी खात्री झाल्यावर तुमचा धर्म आमच्यासाठी नाहीं असें समजून आम्हीं आमचा मार्ग सुधारला तर त्याबद्दल तुम्हांला वाईट कां वाटावें ? परमेश्वरप्राप्ति हिंदुधर्मातच आहे आणि इतर धर्मांत नाहीं असें नाही. हिंदुधर्माला सांप्रतची विषमताच कायम ठेवावयाची असेल तर त्यानें आमच्यापासून प्रेमाची व आपलेपणाच्या भावनेची अपेक्षा तरी कां करावी ?
हिंदुधर्म हा आमचा आहे किंवा नाहीं
या प्रश्नाचा एकदां कायमचा निकाल आम्हांला करून घ्यावयाचा आहे. धर्माला सध्यां जे विषमतेचें विकृत स्वरुप प्राप्त झालेलें आहे तें घालविणें हें काम आमच्या हातीं नाहीं. चालू वहिवाटीचे हक्क बळकावून ज्यांनीं आमचे हक्क हिरावून घेतले आहेत आणि ज्यांची बहुसंख्या आहे, ज्यांचा समाज विशेष पुढारलेला आहे, शिक्षण व संपत्ति हीं ज्यांच्यापाशीं आहेत त्याच वर्गातल्या लोकांचे धर्म सुधारणा करणें हे कर्तव्य आहे. बौद्ध किंवा आर्यसमाजिस्ट होऊन उच्चवर्णीय म्हणविणाऱ्या लोकांच्या दुराग्रहावर म्हणण्यासारखा कांही परिणाम होणार नाहीं, म्हणून तो मार्ग स्वीकारण्यांतहि आम्हाला अर्थ वाटत नाहीं. हिंदु लोकांच्या दुराग्रहाला यशस्वी रीतीनें तोड द्यावयाची म्हणजे खिस्ती किंवा मुसलमान होण्याचेंच धर्मांतर करून एकाद्या शिरजोर समाजाचेंच पाठबळ मिळविलें पाहिजे म्हणजे अस्पृश्यतेचा डाग निघून जाईल. हा निर्वाणीचा उपाय बहिष्कृत वर्गानीं योजावा किंवा नाहीं, हें ठरविणें आमच्या हातीं नाहीं. तें इतर हिंदूंच्याच हातीं आहे. त्यांनी शेवटपर्यंत आपला दुराग्रह कायम ठेवला आणि बहिष्कृतवर्गांचे वाजवी हक्क कबूल केले नाहींत तर आम्हीं न सांगतांहि बहिष्कृत वर्गातील तरूण पिढी धर्मत्यागाचा मार्ग स्वीकारणार आहे. आम्हीं केवळ निमित्तमात्र आहों, हें आमच्या टीकाकारांनी कृपा करून विसरू नये. असो. आतां