आमचे टीकाकार . - Page 275

आमचे टीकाकार २३१

आमच्यावरील दुसरे आरोप

कांय आहेत हें पाहूं. एक आरोप हा कीं आम्हीं स्पृश्य वर्गाचा द्वेष करितों. पण आम्हांला कोणाचाच द्वेष करण्याची जरूरी नाहीं. स्पृश्य वर्गात आमचे अनेक स्नेही आहेत. आम्हांला आमच्या कार्याकरितां लढा चालविणें भाग असल्यामुळें आमच्या आड येणाऱ्या लोकांची मने दुखविणें प्रसंगोपात भाग पडतें. परंतु त्यावरून आम्ही स्पृश्यांचा किंवा कोणाचा द्वेष करतों असें समजण्याचें कारण नाही. दुसरा आरोप असा कीं, आम्हीं आमच्या पत्रांत अस्पृश्यतेसंबंधानेंच न लिहितां इतर वादग्रस्त विषयांचीहि चर्चा करतों. परंतु त्यावर आमचा असा उलट सवाल आहे कीं, वादग्रस्त प्रश्‍नांची ज्यांत चर्चा होत नाहीं असें कोणतें वर्तमानपत्र आहे ? इतरांप्रमाणें आम्हांलाहि आमची मतें आहेत आणि तीं प्रतिपादणें हा आमचा हक्क आहेच; पण तें आमचें कर्तव्यहि आहे. शिवाय, हेंहि लक्षात ठेवलें पाहिजे कीं, अस्पृश्यता हा प्रश्न इतर प्रश्नांपासून अजीबात वेगळा करतां येणें शक्य नाही. जातिभेद, धर्मविषयक. कल्पना, ग्रंथप्रामाण्य, राजकीय हक्क, राजकीय चळवळ वगैरे अनेक गोष्टींचा अस्पुश्यतानिवारणाच्या प्रश्नाशीं कमीजास्त प्रमाणाने संबंध पोचतो. हिंदुधर्म व हिदुसमाज यांच्या मुळाशी जी कीड लागलेली आहे तिचा अस्पृश्यता हा एक सर्वात अनिष्ट असा परिणाम असला तरी त्याचें कारण विशिष्ट मनोवृतींत आहे, हे विसरून चालावयाचें नाहीं. म्हणूनच, अस्पृश्यतेसंबंधाने विचार करतांना इतर गोष्टींचा विचार करणें ओघाने प्राप्त होतें. आङमुद्यांवर टीका करून किंवा व्यक्तिशः डॉ. आंबेडकरांना खालीं पाडण्याचां प्रयत्न करून अथवा 'बहिष्कृत भारता ' विरुद्ध निंदासत्र चालवून आमचा पक्ष किंवा आमची चळवळ हाणून पाडणें शक्य नाहीं, हें आमच्या टीकाकारांनी समजून असावें. बहिष्कृत वर्गांत फूट पाडून आमची चळवळ कमजोर करण्याचा डावहि यापुढें यशस्वी व्हावयाचा नाहीं. अस्पृश्यतानिवारणाच्या बाबतींत टोलवाटोलवीं करावयाला आम्हीं सवड देत नाहीं हेंच आमच्यावर कित्येक उच्च वर्णीय म्हणविणाऱ्या टीकाकारांचा इतका रोष आहे त्याचे कारण होय हें आम्ही जाणून आहों.

eco

अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. २९ जुलै १९२७.