२४० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
१ मिस् मालिनी पाणंदीकर-एक लक्ष किंवा एक कोटी हिंदु स्त्रिया, असें गणित करावें लागेल! दुसरी गोष्ट ही कीं, मालिनीबाईंनीं जो विवाह केला तो सामाजिक चालीरीतींना कंटाळून केला नाही. जबरीमुळें केला नाही ; किंवा फसवणूक झाल्यामुळें केला नाहीं. तो राजीखुषीने व अक्कलहुशारीने झालेला विवाह आहे. अशा विवाहाबद्दल त्या व्यक्तीला दोष देण्याचा-नांवें ठेवून छळ करण्याचा समाजाला अधिकार नाहीं आणि असें विवाह मधूनमधून व्हावयाचेच अशा प्रकारें छळ झाला म्हणून ते बंद होणार नाहीत. अशा क्वचित होणाऱ्या विवाहामुळे कमी होणाऱ्या संख्याबळापेक्षां इतर कारणांनीं कमी होणारें संख्याबल किती तरी मोठें आहे. पण तिकडे लक्ष न देतां अपवादभूत उदाहरणाचाच मोठा बाऊं करण्यांत
येत आहे. महाराष्ट्रांतलीं बरीचशीं वर्तमान पत्रे म्हणजे
अज्ञ लोकांना मूर्ख बनविण्याचे कारखाने
आहेत. लोकांना कोणत्या मुद्यावर मूर्ख बनवून आपल्या पत्राचा खप वाढविता येईल याचें या धूर्त पत्रकारांनी एक शास्त्रच बनविलें आहे आणि आपल्या लेखनकलेचा त्याच कामीं ते उपयोग करीत असतात. , हे लेखक मोठे धार्मिक वृत्तीचे, प्रामाणिकपणे जुन्या समजुतीचे आहेत, असें मुळींच नाहीं. त्यांच्या काळजाला हिंदु पुरुषांनी यूरोपीयन स््त्रियांशीं लग्नें केल्यास मुळींच धक्का बसत नाहीं. - मद्यमांसाची तरफदारी करणाऱ्या लोकांनाही ते सत्पात्र ब्राह्मण आणि हिंदू समाजाचे पुढारी समजतात." धर्माच्या नांवावर होणारे अनाचार व अत्याचार त्याना बिनदिक्कत खपतात. ' न लोक : पारमार्थिक :' म्हणजे साधारण लोक स्वतःच्या बुद्धीनें व बारकाईने विचार करणारे असतात हें त्यांना पक्के ठाऊक असतें व त्यामुळें धर्माभिमानाच्या ढोंगाखाली ते स्वार्थ साधूं शकतात. सरकारच्या विरूद्ध लिहिलें तर पीनलकोडचें १२४ (अ) कलम आणि मुसलमानांच्या विरूद्ध लिहिलें तर १५३ (अ) कलम आपल्याला लागू होईल म्हणून सरकारच्या किंवा मुसलमानांच्या वाटेला न जातां, लोकांना मूर्ख बनवून फुकटची लोकप्रियता मिळविण्याचा सोपा मार्ग ते शोधून काढतात. विघातक कृत्यें करण्यावर यांचा धंदा व उदरनिर्वाह चालतो. एखादी संस्था चांगल्या रीतीनें चालत असली तर ते यांच्यानें पाहवत नाहीं. तिच्याविषयी अज्ञ लोकांत गैरसमज उत्पन्न करावयाचा हेंच यांचें शतकृत्य! हिंदुसंघटक व शुद्धी यांच्याविषयी खरोखरच जर यांना कळकळ असती तर हिंदुसमाजाच्या इमारतीला जीं भगदाडें पडलीं आहेत तीं बुजविण्याकडे यांनी लक्ष दिलें असतें. परवां नागपूर येथें हिंदु महासभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष या नात्यानें