वऱहाडांतील ब्राह्मणेतर पक्ष आपल्या सत्वाला नेहमींचा जागता आहे. - Page 288

२४४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

कमिटीला कदीमची रूढी मोडण्याचा अधिकार नाहीं. कमिटीनें अस्पृश्यांस देवळांत जाण्यास परवानगी दिल्यास त्यांच्यांत व इतर लोकांत तंटे उत्पन्न होऊन अनर्थ गुदरेल असें या सभेचें ठाम मत आहे. असें होऊं देणें या कमिटीस इष्ट वाटत नाहीं. सभा सनातन धर्मीय बहुजनसमाजास जबाबदार असल्यामुळें अर्जदारांनीं सनातन धर्मीय बहुजनसमाजाची प्रवृत्ति अस्पृश्यांस या देवळांत जाऊं देण्यास तयार करावी, व तशी प्रवृत्ति दिसून आल्याची चिन्हें दिसतांच ही सभा या प्रश्‍नाचा विचार करील. तथापि सत्याग्रह करणें झाल्यास अस्पृश्यांनी आपले जबाबदारीवर करावा, व त्याचा वाईट परिणाम निघाल्यास त्याची जबाबदारी अर्जदार व त्यांचे पुरस्कर्ते यांच्यावर राहील. या टोलवाटोलवीच्या उत्तराने आम्हांस कांहीं आश्चर्य वाटत नाहीं. जांवई पाहुणा आला असतांनाहि न पान्हवणारा टोणगा एखाद्या वेळीं पान्हवेल, पण वाटेल तो प्रसंग आला, तरी ब्राह्मण्यग्रस्त स्पृश्य लोकांना अस्पृश्यनिवारणाचे बाबतींत कधींहि पाझर फुटणार नाहीं हें आमच्या अस्पृश्य बंधूंनी केव्हांही विसरतां कामा नये. या बाबतींत अस्पृश्यांनी आपली माणुसकी उजवण्यासाठीं देवळांत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला नाहीं तर त्यांचा प्रवेश केव्हांहि होणें शक्‍य नाहीं. यास्तव अर्ज व विनंत्या यावर अवलंबून न रहातां, आमच्या उमरावतीकर अस्पृश्य बंधूंनी श्रीअंबादेवीच्या देवालयांत शिरण्याचा जो निर्धार केला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचें अभिनंदन

करितों.

नेहमींच्या सरावास अनुसरून पंचकमिटीनें बहुजनसमाजाचें लोकमत म्हणजे ब्राह्मणेतर जनतेचें लोकमत अस्पृश्यांस देवालयात प्रवेश करूं देण्यांस अजून तयार नाहीं अशी सबब दाखविली आहे. ही सबब जरी खरी असली तरी या सत्याग्रहाच्या कामीं आमच्या उमरावतीकर अस्पृश्य बंधूंना माघार घेण्याचें कांहीं कारण नाहीं. त्यांच्या सुदैवाने त्यांना या सत्याग्रहाच्या बाबतींत जी ब्राह्मणेतर जनता विरूद्ध आहे असें भासविण्यांत येतें, याच ब्राह्मणेतर जनतेचे सामान्य पुढारी सहाय्य करण्यास तयार आहेत. मुंबई इलाख्यांतील ब्राह्मणेतर पक्षासंबंधाने t अस्पृश्य वगातील लोकांना आदर वाटत नसल्याचे कांहीं प्रसंगीं दिसून येतें. निदान ज्या हेतूनें तो पक्ष अस्तित्वांत आला, तो हेतु साध्य करण्यास ज्या गोष्टी करणें अवश्यमेव आहे त्याकडे या पक्षांनी इतकें दुर्लक्ष केलें आहे कीं, आपला आद्य हेतु या लोकांच्या ध्यानीमनींदेखील नाहीं असा भास होतो. परंतु वऱहाडांतील ब्राह्मणेतर पक्ष आपल्या सत्वाला नेहमींचा जागता आहे याची आम्हींच काय पण ज्याला त्याच्या कामगिरीची माहिती आहे, असा कोणीहि ग्वाहि देऊं

† पाहा, परिशिष्ट क्रमांक - २६.