ब्राह्मणांच्या अन्याय वर्तनावर टीका करणारे ब्राह्मणेतर अस्पृश्यांवर कांहीं कमी अन्याय करीत नाहींत. - Page 294

२५० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

ठेवण्यासारखी आहे की, ब्राह्मणाच्या अन्याय्य वर्तनावर टीका करणारे ब्राह्मणेतर अस्पृश्यांवर कांहीं कमी अन्याय करीत नाहींत. या पंचकमेटींतील ब्राह्मणेतर लोक कांहीं अज्ञान लोक नाहीत. ते अज्ञान जर असते तर त्यांचे वर्तन ब्राह्मण्यास धरून आहे असें समजून त्यांची गय केली असती; परंतु या पंचकमिटींतील कांहीं लोक तर जनतेचे पुढारी म्हणून मिरवीत असल्याचें ऐकिवात येतें. त्यांना तरी आपण कोणतें ध्येय स्वीकारलें आहे व तदनुरुप कोणतें वर्तन ठेविलें पाहिजे हें कळावयास हवे होतें. त्या ट्रस्टीपैकीं एक पुढारी आहे इतकेच नव्हे तर अस्पृश्यतानिवारणावर नेहमींच झोड गाजवीत असे. परंतु याच पठ्यानें अस्पृश्यांविरूद्ध आपलें मत दिलें, इतकेंच नव्हे तर चार चौघांत या अद्यःपाताचें कारण विचारलें असतां, आपण जें केलें तें ट्रस्टी या नात्याने केलें. अशा प्रकारचा युक्तिवाद करून आपल्या तोंडाला लागलेली काळोखी पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. अशा स्वभावाच्या लोकांनी न्यायाचें कितीही मोठें सोंग आणले तरी तें फार दिवस टिकणें शक्य नाहीं. मद्रास एथील जनतेने यांना जें पदच्युत केलें, तें कांहीं कारणाशिवाय केलें नाहीं.

आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. २ सप्टेंबर १९२७.