६१
महार आणि त्यांचे वतन
(१)
गेल्या वर्ष दोन वर्षांपासून महारकी वतनाची बरीच चर्चा सुरू झालेली दिसून येते. केवळ याच प्रश्नाचा विचार करण्यासाठी गतवर्षी नाशिक जिल्ह्यांत नांदगांव येथें व सातारा जिल्ह्यांत रहिमतपूर येथें महार समाजाच्या दोन प्रचंड सभा भरविण्यांत आल्या होत्या व त्या सभेंतून महारकी वतनाच्या बाबतींत कांहीं महत्वाचे ठराव पसार करण्यात आले होते. ते ठराव यापूर्वी प्रसिद्ध झालेले आहेत. तरीपण ते अस्पृश्य वर्गातील वाचकांच्या अवलोकनांत आले किंवा नाहीं, याविषयीं शंका वाटत असल्या कारणानें आम्ही ते आज दुसरीकडे छापले आहेत.1 त्याचप्रमाणें नुकत्याच बेळगांव जिल्ह्यातील बहिष्कृत वर्गाच्या गांवनाळ येथें भरलेल्या सभेंत महारवतनासंबंधी कांही ठराव पास करण्यांत आल्याचें जाहीर करण्यात आले आहे. या चळवळीस अनुसरून डॉ. आंबेडकर यांनी वतन अँक्टांत दुरुस्ती घडवून आणणारा एक कायद्याचा मसूदा तयार केलेला आहे व तो लौकरच मुंबईच्या कायदे कौन्सिलांत मांडण्यात येणार आहे.
एका दृष्टीने वतनाच्या प्रश्नाचा व्याप काय तो महार जातीपुरता आहे. पण दुसऱ्या दृष्टीनें पहातां या प्रश्नाचा व्याप दिसतो त्यापेक्षा फारच मोठा आहे. सन १९२१ च्या मुंबई इलाख्याच्या खानेसुमारीवरून असे दिसतें कीं या इलाख्यांतील एकंदर लोकसंख्येत मांग लोक दर हजारीं दहा व चांभार लोक दर हजारीं अकरा सापडतात. पण महार लोक दर हजारी ५० सापडतात. अस्पृश्यांतील इतकी मोठी लोकसंख्या वतनपद्धतीच्या सापळ्यांत अडकून जाऊन हतबल झाली असतां अस्पृश्यतानिवारणांचे कार्य यशस्वी होणे दुरापास्त आहे. अशा दृष्टीनें पहातां, महार वतनाचा प्रश्न नुसत्या महार जातीचा नसून महाराष्ट्रातील साऱ्या अस्पृश्य जातींचा आहे, असें म्हणण्यास कांहीं हरकत दिसत नाहीं. यास्तव या प्रश्नाचा सविस्तर विचार करण्याचा आज आमचा इरादा आहे. प्रथमतः
वतन म्हणजे काय ?
हे समजून घेतलें पाहिजे. सन १८७४ च्या वतन अँक्टांत “ कोणतीही वतनी मालमिळकत असल्यास ती व वंशपरंपरेचा हुद्दा व त्यासंबंधी हकक व अधिकार
† पाहा, परिशिष्ट क्रमांक २७.
‡ पाहा, परिशिष्ट क्रमांक २८.