२५२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
हीं मिळून वतन होतें,” अशी ' वतन ' या शब्दाची व्याख्या करण्यात आलेली आहे. या व्याख्येवरून पहातां वतन या शब्दामध्ये दोन गोष्टींचा समावेश होतो, (१) वंशपरंपरेचा हुद्दा ; व (२) वतनी मालमिळकत. आता वंशपरंपरेचा हुद्दा, हें जरी वतनाचें एक अंग आहें, तरी त्यात सर्व प्रकारच्या वंशपरंपरेच्या हुद्यांचा समावेश होत नाही. एखादा हुद्दा केवळ वंशपरंपरागत चालतो, एवढ्यावरूनच तो वतनी हुद्दा आहे असें कायद्यावरून म्हणता येणार नाही. कारण वतन अक्टांत
वंशपरंपरेचा हुद्दा याचा अर्थ
“ सरकारी साऱ्याचा कारभार करण्यासंबंधी, किंवा तो वसूल करण्यासंबंधी,
किंवा गांवचे पोलिसांसंबंधी, किंवा गांवच्या हद्दी ठरविण्यासंबंधी किंवा मुलकीं कारभाराच्या इतर बाबतींसंबंधी कामे करण्यासाठी वंशपरंपरेने धारण केलेला प्रत्येक हुद्दा असा ठरविण्यात आला आहे. या वंशपरंपरेच्या हुद्याची जी कायद्यांनी केलेली व्याख्या वर दिलेली आहे ती जुन्या परंपरेकडे पाहतां अगदीं संकुचित अशी आहे. पूर्वीच्या काळी दर गांवास वंशपरंपरेच्या हुद्देदारांची संख्या २४ असे. त्यापैकी बारा जणांना बलुतेदार व बाकी बारा जणांना अलुतेदार असे संबोधण्यांत येत होते. पेशवाईत अखेर या अलुते बलुतेदारांची संख्या इतकी फोफावली होती की, या चोवीस अलुते बलुतेदारांच्या जोडीस तितक्याच लोकांची भर पडली होती व त्या सर्वांना वतनदारांच्या यादींत समाविष्ट करण्यात आलें असें. जेव्हा इंग्रज सरकारचा अंमल सुरू झाला तेव्हा या बेसुमार वाढलेल्या वतनपद्धतीत छाटाछाट करण्याचा विचार ठरला व त्याप्रमाणे या अलुत्याबलुत्यांचे तीन वर्ग करण्यात आले. (१) सरकारअवश्यक वतनी गांव कामगार; (२) रयतअवश्यक वतनी गांव कामगार ; व (३) सरकार व रयत यांस अनवश्यक असे वतनी गांव कामगार, यापैकी दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्गातील वतनदार जे सरकारला अवश्यक नाहीत अशांच्या इनामावर कर (जुडी) बसवून लोकोपयोगी कामाच्या तगाद्यापासून जरी नसलें तरी सरकारी नोकरीच्या तगाद्यापासून त्यांना मुक्त करण्यात आलें. तेणेंकरून त्यांची स्थिती आणि गांवातील रयतेची स्थिती सारखीच झाली व त्यामुळें त्यांना वतन अँक्ट लागू करण्यात आलेला नाही. वतन अँक्ट कायतो पहिल्या वर्गाच्या गांव कामगारांना लागू करण्यात आला आहे. कारण जे गांव कामगार सरकारी कारभार चालविण्यास आवश्यक आहेत अशा संबंधीच कायद्याचे बंधारण असणे जरूर आहे असे इंग्रजी अधिकाऱ्यांचे मत पडले. या नव्या व्यवस्थेमुळे पूर्वीचे बाराबलूते लयास जाऊन हल्ली वतन अँक्टाप्रमाणे गांवचे कामगार म्हटले म्हणजे काय ते पाटील, कुळकर्णी आणि महार असे तीन असून कारणपरत्वे चौथा जागल्या असतो. यांपैकी आपल्या महाराच्या वतनाच्या गुणदोषाचाच काय तो विचार करावयाचा आहे.