महार आणि त्यांचे वतन - Page 297

महार आणि त्यांचे वतन २५३

महारांची कामें निश्‍चित नाहींत.

कोणताहि नोकर झाला तरी त्यानें करावयाची कामे मुकरर असावयास पाहिजे आहेत. परंतु महार वतना संबंधी ध्यानांत ठेवण्या सारखी गोष्ट ही कीं महारांची कामे मुळीच निश्‍चित झालेली नाहीत. इतकेच नव्हे तर तीं मुद्दाम होऊन सरकारने अनिश्‍चित ठेवली आहेत. सन १८७४ चा वतन अँक्ट जेव्हा पास करण्यात आला तेव्हा त्याच्या १८, ६९ व ८३ या कलमांवर वादविवाद चालू असतांना कांहीं लोकांनी महारांची कामें ठराविक करण्याच्या दृष्टीने त्या कलमांत फेरफार करण्यात यावा अशी सूचना त्यावेळी कायदेकौन्सिलांत आणिली होती. परंतु सरकारने आपल्याला महारासारखे कांही सांगकामे व हरकामे नोकर पाहिजे आहेत असा आग्रह धरल्यामुळे ती सूचना अमान्य झाली व महार लोक हे सरकारी गांव नोकर असल्यामुळे त्यांची कामे कोणती हे ठरविण्याचा अधिकार वतन अँक्टाप्रमाणे जिल्ह्याच्या कलेक्टरास देण्यात आला. या अधिकारान्वये महारांना कोणती कामें करावी लागतात हें पाहावयाचे असल्यास कोणत्याहि गांवचे महारवतन प्रोसिडिंग पाहिल्यास कळून येण्यासारखे आहे. कांही दिवसांपूर्वी आमच्या हाती नाशिक जिल्ह्यांतील एका लहर गांवच्या महारवतन प्रोसिडिंगचे कागद आले होते. त्यात महारांनी करावयाची सरकारी कामे खालील प्रमाणे नमूद करण्यात आली होती. (१) वसूल गोळा करण्याच्या बाबतीत गांवच्या अधिकारी लोकांस मदत करणे. (२) तालुक्‍याचे गांवी अगर अधिकारी सांगतील त्या ठिकाणी टपालाची नेआण करणे. (३) तालुक्‍याचे कचेरीत वसूल पोहोंचता करणे. (४) जन्ममृत्यूची खबर गोळा करणे. (५) सरकारी अंमलदार गांवी येतील त्यांचा बंदोबस्त ठेवणे व त्यांची सांगतील ती कामे करणे व (६) अन्य प्रकारची कामे पडतील ती करणे. ही कामाची यादी कशी अघळपघळ व ऐसपैस आहे हे दिसतच आहे. ह्या कामांचा व्याप दिसावयाला अगदी थोडा दिसतो. पण ती कामे किती संतापदायक आहेत हे बिचाऱ्या महारांनाच ठाऊक ! साधी टपालाची बाब जरी घेतली तरी महाराला

आठ दहा मैल मकान २ पैशाने जाणाऱ्या लखोट्यासाठी अन्नपाण्यांवाचून उन्हांत

तळतळ करीत, अनवाणी रखडत जावे लागते! ही ताबडणी काय थोडी झाली ! ! सरकारी अंमलदारांची कामे अशीच भरमसाठ आहेत. अंमलदारांचा बंदोबस्त ठेवणे म्हणजे नुसते त्यांचा तंबू डेरा ठोकून त्यास सावली करून देणे, किंवा त्यांना बाजार हाट आणून त्यांची सरबराई करणें इतक्यानेच संपत नाही. अंमलदारांचे घोडे व बैल सोडणे, त्यांना चंदी पाणी पुरविणे, त्यांना खरारा करणे वगैरे कामे सरकारी कामे नाहीत असा महारांचाच काय पण कोणाचाहि