महार आणि त्यांचे वतन - Page 300

२५६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

घरानध्यें पाहिलें असतां असें दिसून येईल कीं बुटलेर कुकचें काम करणार नाही ; कुक मेसमनचें काम करणार नाहीं ; मेसमन बॉयचें काम करणार नाही; व ही कामाची खातेवार व्यवस्था त्याच अंमलदारांना न्याय वाटते परंतु अनेक खात्यांकडून होणाऱ्या मागणींना महारांनी पुरें पडावें असे हुकूम सोडतांना याच अंमलदारांना आपण अन्याय करीत आहोंत असें मुळींच वाटत नाही ! कामें कोणतीं हँ निश्चित नाहीं तर नाहीं पण

माणसें किती हेहि निश्‍चित नाही.

जशी महारांची कामे म्हणजे सांगतील तीं, तशीं महारांचीं माणसें राबायला मिळतील तेवढीं ! गांव कामगार महारांच्या बाबतीत ज्याप्रमाणें कामें नियमित नाहीत किंवा खातीं नियमित नाहींत त्याप्रमाणें कामावर माणसें किती नेमावयाची हेंहि नियमित नाही. नाही म्हणावयास सरकारी ठराव आहे कीं गांवची लोकसंख्या १ ते ५०० असेल तर गांवाला १ कामगार महार नेमावा. लोकसंख्या ५०१ ते १००० जर असेल तर २ कामगार महार नेमावेत व पुढे दर १००० लोकसंख्येला १ अधिक महार नेमावा. परंतु वस्तुस्थितीचा व या ठरावाचा ताळमेळ कोठेंच दिसत नाहीं. असे सांगण्यात येतें की, नगर जिल्ह्यांत ४ हजार वस्तीच्या पारनेर येथे ३२ व ८ शें वस्तीच्या ठाकूर पिंपळगांव येथे ८ व १६२५ वस्तीच्या धांदरफळ गांवी १६ महार राबतात । सरसकट २५० चौरस मैल क्षेत्र व पाऊण लाख लोकवस्ती असणाऱ्या तालुक्याला १५ / १६ मुलकी शिपाई व ३० / ३५ पोलीस शिपाई पुरतात. तर टीचभर खेड्यांत आणि मूठभर वस्तीत येवढें मोठें कामगार महाराचें दळ राबविण्यांत यावें हें आश्चर्यकारक नव्हे काय ?

कामें नियमित नाहींत, खाती नियमित नाहींत, माणसे नियमित नाहींत । पण

कामाचे तास तरी नियमित आहेत काय?

तेही नाहींत !! २४ तास कामावर हजर असलें पाहिजे. कोणत्या वेळी कोणता अधिकारी येईल आणि बिगार न्यावयास सांगेल याचा नेम नाहीं. पुरुष हजर नसला तर बायको, बायको नसली तर मुलगा किंवा मुलगी व तीही हजर नसली तर म्हातारा किंवा म्हातारी ! कोणी तरी बदली म्हणून काम करण्यास एका पायावर तयार असलेच पाहिजे. मग ते काम कोणत्याहि वेळीं येवो. रात्र म्हणतां येणार नाहीं, आजारी आहे म्हणतां येणार नाहीं, घरीं मयत झालें आहे असें म्हणतां येणार नाहीं. हांक मारली की तडक निघालेंच पाहिजे. जर का उशीर झाला तर अधिकारी, मग तो फाटका कां असेना महाराच्या आईबहिणीच्या, लेकीबेटीच्या नांवानें लाखोली वाहण्यास केव्हांच मागे पुढे पाहणार नाहीं. व हे सर्व आमचे महार लोक निमूटपणें सहन करितात ! |