महार आणि त्यांचे वतन २५९
व दुसरा कोणी तर हें काम पत्करणार नाहीं तर गांवांत उपद्रव होईल या भितीनेंच वरील इशारा वजा ठराव काढून हे गलिच्छ काम महारांवर लादण्याचा हा अतिक्रम सरकारनें केला आहे. हा ठराव जाहिर करतांना मेलेलीं जनावरें ओढणें हे महार लोकांच्या उन्नतीच्या दृष्टीनें इष्ट आहे किंवा अनिष्ट आहे याचा विचार केला असावा असें मुळींच वाटत नाहीं. ढोरें ओढणें कमीपणाचें लक्षण आहें असें जर लोक मानीत नसते तर महारानी ढोरें ओढण्यांत कांहीं म्हणण्यासारखा दोष नव्हता. हें एक कमीपणाचें काम इतकेंच नव्हे तर या गलिच्छ कामामुळें महारांना अस्पृश्य मानण्यांत येतें असे सनातन हिंदु लोक जगाला व सरकारला नेंहमी सांगतात. ही सबब प्रामाणिक आहे किंवा अप्रामाणिक आहे तो प्रश्न निराळा. परंतु एवढें खरें कीं, ज्याचें पडें त्यानें न्यावे असा परिपाठ जर पडला तर सर्वच लोक अस्पृश्यांशी तत्सम झाल्यानें अस्पृश्यता नष्ट होण्याच्या मार्गास लागेल. परंतु असा परिपाठ पडण्यास महारांनींच ढोरें ओढावी ह्या जबरीच्या अन्यायाचे उच्चाटन करावयास पाहिजे आहे. आतां काहीं लोक असेंहि म्हणतील कीं जेथें समाज आहे तेथें अशा प्रकारची गलिच्छ कामें असावयाचींच व तीं कामें करावयाचें कोणाच्यातरी माथीं पडावयाचें मग जर महारांनीं तीं कामें केलीं तर त्यांत काय बिघडले ? या युक्तिवादाला आमचे उत्तर असें आहे कीं कोठेंही झालें तरी अशीं कामें करणें न करणे हे करणारांच्या खुशीवर राखून ठेवलेले असतें. ज्याला वाटेल त्यांने करावींत ज्याला नको असेल त्यांनी करूं नयेत. येथें अन्याय जो होत ate तो हा कीं सरसकट महार जातीवर ही गोष्ट जबरदस्तीनें लादण्यांत येत आहे. महार झाला की त्यानें ढोरें ओढिलींच पाहिजेत. मग त्याची मर्जी असो किंवा नसो ! येथवर महार वतनपद्धतींत दोष कोणते याचा विचार केला आहे. तिच्यांत गुण कोणते याचा विचार पुढील अंकी करू.'
(२)
|
गेल्या अंकात महार वतनाचा कामाच्या दृष्टीनें विचार केला व त्यांत कोणते दोष आहेत हें आम्ही लोकनिदर्शनास आणून दिलें. मुशाहिऱ्याच्या दृष्टीनें महार वतनाचा विचार करावयाचा आहे. महारकीच्या कामाकरिता
महारांना मुशाहिरा काय मिळतो
याची जर चौकशी केली तर आपल्याला असें दिसून येईल कीं महारकीच्या कामाकरितां महारांना साधारणपणें तीन प्रकारचें उत्पन्न असतें : (१) इनाम जमीन (२) बलूते आणि (३) नक्त पगार. हे मुशाहिऱ्याचे तीनही प्रकार सर्वत्रच आढळतात असें नाहीं. कोठे इनाम जमीन असते तर कोठें नसते. काहीं
१ . अग्रलेख-बहिष्कृत भारत, ता. २ सप्टेंबर १९२७.