२६४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
महारवतनाला अत्यंत घाणेरडें व किळसवाणें स्वरूप आलें आहे. बलूते म्हणजे पगार, मुशाहिरा किंवा नोकरीचा मोबदला असा जो महारांचा व रयतेचा समज व्हावयाचा तो तसा न होतां बलूतें म्हणजे भीक आणि महार म्हणजे भिकारी असा उभय पक्षांचा ग्रह होऊन बसला आहे. कोणत्याही समाजांत एकदां श्रेष्ठ आणि कनिष्ठ,स्वामी आणि किंकर, दाता आणि याचक असे भेद उत्पन्न झाले म्हणजे ज्यांना नेहमीं श्रेष्ठ म्हणवून घेण्याची संवय जडलेली असते त्यांच्या मनांत आपण त्या योग्यतेस सर्वस्वी पात्र आहोंत अशी भावना जागृत राहून ती इतकी दृढ होते कीं अंगीं कोणत्याहि प्रकारचे गुण नसताना आपण वंदनीय आहोंत असें वाटतें आणि आपल्यापेक्षा कनिष्ठ असणाऱ्या लोकांनी त्याला आपण होऊन मान दिला नाही, तर त्याचें ताडन अथवा दंडन करुन तो घेण्याचा ते प्रयत्न करितात. त्याचप्रमाणे जे कनिष्ठ ठरले त्यांना सांगतील तें करण्याची आणि वागवतील तसे वागण्याची संवय लागते, अशा रीतीनें जे एकवार परवश झाले त्यांना तीच स्थिति बरी वाटूं लागते. ऐश्वर्य आणि श्रेष्ठता यांच्याठायीं मनुष्यमात्राची नेहमींच भक्ति असते. पिढ्यान्पिढ्या या भावनेचें संगोपन झालें असतां ती इतकी दृढ होऊन जाते कीं पुढें ज्यांना कनिष्ठ मानून घेण्याची संवय झाली मग आपण किती प्रयत्न केले तरी आपली श्रेष्ठता वाढविण्याची इच्छा मनाला शिवत देखील नाहीं. याचे प्रत्यंतर आपणस महार वतन पद्धतींत खासे पाहावयास सांपडते.
बलुतें देऊन महार लोकांना आपण जगवितों अशी रयतेची भावना झाल्यामुळें रयतेंत फाजील आढ्यता व उद्दामपणा वाढला आहे. गांवांत महार लोकांना शिवीशिवाय कोणी बोलत नाही. ब्राह्मण, मराठा, कुणबी किंवा इतर वरच्या जातीचें शेंबडें पोर देखील वयोवृद्ध अशा एखाद्या महार जातीतील पुरूष अगर स्त्री यांस बेमुरवतपणे वाटेल तशी मोजून शिवी देतें. ब्राह्मणाच्या घरीं जशी देवपूजा टळत नाहीं, त्याप्रमाणें महाराच्या माणसाला शिवी खाल्याशिवाय गांवांत दिवस जात नाहीं. नुसत्या शिवीवर जरी भागते तरी बरें. परंतु शिवीबरोबर केव्हां केव्हां मारहि बसावयाचा. रोजच्या रोज आईवरून शिवी, सुनेवरून शिवी, बायकोवरून शिवी, मुलीवरून शिवी असा शिव्यांचा वर्षाव महार लोकांवर होत असतां त्यांना डोळे वटारण्याची तर राहूं द्या परंतु नुसती वर बघण्याची देखील ताकद नाही. मुंगीवर पाय बडला तर ती देखील उलट डसण्याचा प्रयत्न करिते. पण महार जात गाईसारखी गरीब होऊन गेली आहे. तिची नांगी मोडून अगदीं खच्चीं झाल्यासारखी झाली आहे. इतकी कीं, “AY तुमचा दास आहे मला आपल्या जोड्यांत वागवून घ्या' अशा दीनवाण्या शब्दाखेरीज महार