महार आणि त्यांचे वतन - Page 309

महार आणि त्यांचे वतन २६५

लोकांच्या तोंडून दुसरी भाषा ऐकूं येत नाही. आणि ती कशी येणार ? ज्या जातींतील प्रत्येक माणूस उपजल्यापासून तों मरेपर्यंत दुसऱ्याच्या अन्नावर जगतो, ज्याचा देह दुसऱ्याच्या उष्ट्या घासकुटक्यावर पोसलेला असतो त्याच्या अंगी आत्मतेज तें काय असणार? आत्मतेज उत्पन्न होण्यास ज्यानें त्यानें आपल्या जीविताची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली पाहिजे. आपल्या परिस्थितीशी झगडलें पाहिजे. आपल्या बलाची, बुद्धीची व कर्तुत्वशक्तिची पराकाष्ठा केली पाहिजे. सर्वत्र चाललेल्या जीवनकलहांत दंड थोपटून उभें राहिलें पाहिजे. आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या मनगटाशी मनगट घांसून होईल तितकें यश संपादन केलें पाहिजे. त्याशिवाय मनुष्यमात्र स्वतंत्र होऊन दुसऱ्याच्या आदरास कधींच पात्र होणार नाहीं. परंतु बलुत्याची आणि भिकेची खात्री असल्यामुळें महार जातीनें आपल्या जीविताची जबाबदारी कधींच ओळखिली नाहीं. आपलें काय होईल असा प्रश्न महारांना केव्हाच पडत नाहीं. कांहीं झालें तरी वेसकराची काठी आहेच. कांहीं नच झालें तरी हक्काची भीक चुकली नाही. अशा परिस्थितीत वाढलेला माणूस बैलासारखा बसकटीस येऊन पुढें पाऊल घेण्याचें नाकारु लागला तर त्यांत नवल काय ?

महारकी वतन खालसा करा असें म्हणण्याचे दुसरें कारण असें की,

वतनामुळें महारांतील महत्त्वाकांक्षा साफ मारली गेली आहे

आजकाल वरिष्ठ वर्गात अहर्निश धडपड चालू असलेली नजरेस पडते. कोणी

बॅरिस्टर होण्याची हांव धरतात, कोणी कलेक्टर होऊ म्हणतात, कोणी दिवाण होऊ म्हणतात व कोणी व्यापारांत उडी घालतात. एकूण वरिष्ठ वर्गांत मोठे होण्याची भावना अत्यंत प्रज्वलित असलेली दिसून येते. त्या मानानें पाहतां महार जात अगदी निश्चेष्ट पडलेली दिसते. यांचें कारण काय असा जर आपण प्रश्न केला तर त्याला एकच उत्तर देतां येईल ; आणि तें हें कीं, महार लोकांत महत्त्वाकांक्षा नाहीं. कोणाहि माणसाला आपली उन्नति करुन घ्यावयास संधि ही लागतेच. परंतु त्याबरोबर आपण मोठें व्हावें, अशी भावनाहि त्यांच्या ठायीं रुजावी लागते. किंबहुना, संधि असूनहि महत्त्वाकांक्षेच्या अभावी किती तरी माणसें अवनत झालेलीं-नव्हे वायां गेलेली-आढळण्यांत येतात. उलटपक्षीं, ज्यांच्यांत मोठेपणाची भावना जागृत झालेली आहे असे लोक संधि नसतांनाहि लाथ मारतात तेथें पाणी काढतात आणि आपल्या महत्त्वाकांक्षेच्या बळावर वैभवाच्या शिखरावर चढतात. अशा प्रकारची महत्त्वाकांक्षा महार लोकांत कां नाहीं हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्‍न आहे. त्याचें उत्तर मात्र अगदी सोपें आहे. चालतें तोंपर्यंत चालवावयाचे, हा मनुष्यमात्राचा सर्वसाधारण स्वभाव आहे. दारांतल्या