महार आणि त्यांचे वतन - Page 312

२६८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

घातलीं. ह्या महारानें अतिक्रम केला असें वाटून कौलें काढ नाहीतर घर जाळूं म्हणून त्याला गांवाने धाक घातला. केवळ महाराने जमीन घेतली येवढ्यावरूनच गावकऱ्यांनी थैमान घातल्याचीं उदाहरणे अनेक देतां येतील. विषाद वाटतो तो हा कीं असा एकादा सुधारणाप्रिय महार गावांत निघाला तर त्याला महार लोकांची देखील सहानुभूती नसते याचे कारण महारांना सुधारणा आवडत नाहीं असें नाहीं. पण करतील काय बिचारे | गांवाला नेहमीं अनन्य शरण असल्याखेरीज त्यांना गत्यंतरच नाही. याचें कारण असें कीं महारांना जुन्या चालींचा प्रतिकार करण्याचा प्रसंग आला किंवा इच्छा उत्पन्न झाली म्हणजे त्यांना भाकरीची व बलुत्याची आठवण होते, मारामार केली, उलट बोललो तर आपल्याला भाकरी कोण वाढील, आपल्याला बलुतें कोण देईल? आणि आपली भाकरी व बलुतें बंद झाले तर आपण जगणार कसे ? हे प्रश्‍न त्यांच्या डोळ्यासमोर नेहमी उभे राहतात. याचें कारण असें कीं गावकऱ्यांचे व महारांचे बिनसलें म्हणजे गांवकरी आधीं महारांचे गांवबंद करितात आणि गांव बंद झाले कीं महारांच्या नाड्या लगेच बंद पडून ते गावाकऱ्यांना शिरी वहाण व दांतीतृण धरून ते सांगतील त्याप्रमाणें नांदण्यास कबूल असतात. महारांचा गांव बंद करणें हें गांवच्या लोकांच्या हातीं एक मोठेंच शस्त्र आहे. त्याचा उपयोग वाटेल त्या प्रसंगी करण्यांत येतो यावरून उघड आहे की ज्या भाकरीवर महार जगतात त्या भाकरीमुळे महारांचे मरण होते। एकाच परीने सुधारणेच्या कामी महारांचे वतन महारांना नडतें असे नाही, तर तें अनेक WH नडतें. महारांचे वतन राहील कीं जाईल, हें सर्वस्वी पाटील, कुळकर्णी व मामलेदार यांच्या मेहरबानीवर अवलंबून असतें, ह्या तिघां अधिकाऱ्यांची एक जात जरी नसली तरी महारांच्या बाबतीत त्यांचे एकमत असतेच. कारण महारांनी गुलामाप्रमाणे वागावें, वर डोके काढूं नये ही त्या सर्वांचीच इच्छा महारांनी गावकीचे काम कितीही चांगल्या तऱ्हेने केलें पण इतर बाबतीत जर का महार प्रमाणाने वागले नाहीत तर त्यांच्या कामाबद्दल खोटा नाटा रिपोर्ट होऊन त्याचे वतन खालसा व्हावयाचें ही एक भीति महारांच्या पोटात सदा सर्वकाळ असते. अशा या वतनपद्धतीमुळे महारांचे जिणें सर्वस्वी पराधीन झालें आहें व जोपर्यंत ते पराधीन आहेत तोपर्यंत त्यांना स्वइच्छेनुरूप सुधारणां करणे केव्हांच शक्य होणार नाही." |

(३)

वतनपद्धतीपासून महार कामगारांचे तसेंच महार जातीचें कसें नुकसान झाले आहे, व त्याला महारकी वतन खालसा करणे हा एकच उपाय कसा लागू पडतो

१ : अग्रलेख-बहिष्कृत भारत, ता. १६ सप्टेंबर १९२७.