महार आणि त्यांचे वतन - Page 316

२७२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

तुम्ही जमिनी सोडीत नाहीं तर आम्हीही तुम्हांस वतनदारीच्या कामाच्या जबाबदारीतून मुक्त करणार नाहीं, असें सरकारनें म्हणणें केव्हांहि रास्त होणार नाहीं. महारांच्या वतनी जमिनी आपल्या कबजांत ठेवण्याचा सोस सरकारनें पुरविला तर सरकारचा तोटा होईल, हे खरें. परंतु महारांना वतनाच्या गर्तेत खितपत पडावयास लावून त्यांची वाढ खुंटविल्याने होणारा समाजाचा तोटा त्यापेक्षां अनेक पटीनें मोठा आहे, हें सरकारनें विसरतां कामा नये. तेव्हां जसें पुष्कळसा अर्थ साधण्यासाठी थोडासा अनर्थ होत असला तरी तो पत्करणें न्यायाचे आहे. या तत्त्वानुरूप सरकारनें या बाबतींत वर्तावें हे त्यांस उचित आहे.

आतां, महारांनी काम करण्याचे सोडून दिलें तर त्यांच्याऐवजी दुसरे नोकर नेमून सरकारला आपली कामें करून घ्यावी लागतील व अशा नव्या नोकरांना पगार द्यावा लागेल. परंतु महार लोक वतन सोडल्यावर इनाम जमीनी आपल्या भोगवट्यास ठेवूं म्हणाले तर या नवीन नोकरांचा पगार कोठून आणावयाचा ? असा प्रश्‍न सरकारतर्फे पुढें येण्यासारखा आहे. हा प्रश्‍न सोडविणें विशेष जड नाहीं असें आम्हांस वाटतें. एकदां पगारी नोकर नेमावयाचें ठरलें म्हणजे सरकार हल्लीप्रमाणें नोकरांचें फाजील दळ राबविण्याचे बंद करून जरुरी पुरते एक दोन नोकरच नेमील. या ठराविक नोकरांच्या पगाराची तरतूद करण्यासाठी महारांच्या जमीनी काढून घेण्याचें कांहींच प्रयोजन पडणार नाही, असा आमचा दृढ भरवसा आहे. कारण महारांनीं सोडून दिलेलें बलुते व नक्त पगार या दोन उत्पन्नाच्या बाबी या नव्या नोकरांच्या पोटगीखातर पुरेशा होतील. तथापि सरकारला याविषयीं संशय वाटून महारांचे वतन खालसा करण्यानें आपणास कोणत्याहि प्रकारची तोशीस लागूं नये, असा कांटेकोरपणाचा हट्टच जर सरकारनें धरला तर त्यासहि आमची संमति आहे. कारण कोणत्याहि अटींवर महार वतन खालसा व्हावें, अशी आमची इच्छा आहे. यास्तव सरकारला कानमान करण्यास सवडच मिळू नये म्हणून आम्ही असें सुचवितों कीं,

महार-वतन खालसा करावें, पण महारांच्या इतर जमिनी काढून

घेण्याऐवजी त्यावर मामुलजुडी बसविण्यांत यावी. म्हणजे कोणताच वाद शिल्लक उरत नाहीं. महारांच्या इनाम जमिनी महारांजवळ राहून महारांची वतनांतून सुटका होते. लागेल ते पगारी नोकर नेमून त्यांच्याकडून काम करून घेण्यास सरकार स्वतंत्र होतें व त्यांच्या खर्चाचा बोजा सरकारवर पडत नाहीं, अशा प्रकारच्या तडजोडीचा मार्ग उभयपक्षांनीं या प्रकरणांत स्वीकारावा, È आम्हांस श्रेयस्कर वाटतें.