स्वीकारले आणि समाजाला पहिल्याप्रथम वाचाही प्राप्त करून दिली. डॉ. बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी ब्रिटनला गेल्यामुळे हे वृत्तपत्र लवकरच बंद पडले. यानंतर बाबासाहेबांनी १९२७ मध्ये बहिष्कृत भारत या वृत्तपत्राची सुरुवात केली. या वृत्तपत्राच्या माध्यमातून बाबासाहेबांचे वृत्तपत्रीय कार्यकर्तृत्व खऱ्या अर्थाने बहराला आले. मूकनायक ते प्रबुद्ध भारत असा त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचा प्रवास उत्तरोत्तर वर्धिष्णू होणारा आहे. इ. स. १९२० ते १९२८ या आठ वर्षांच्या कालखंडातील बाबासाहेबांचे लेखन या खंडात समाविष्ट केलेले आहे. मूकनायक व बहिष्कृत भारत या वृत्तपत्रांतील विचारविश्व या ग्रंथामध्ये साकल्यपूर्वक आविष्कृत झाले आहे.
वृत्तपत्र हे विकासाचे प्रभावी साधन होय. पाश्चिमात्य संस्कूतीमधून वृत्तपत्र या देशात आले. नवविचारांच्या आविष्काराचा नवा प्रवाह या वृत्तपत्रांनी आकारास आणला. आधुनिक कालखंडात वृत्तपत्र हे स्वमत प्रतिपादनाचे व विचाराविष्काराचे अमोघ माध्यम बनले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्रांचे महत्त्व पुरते ओळखले व या माध्यमाचा लोकजागृतीकरिता प्रभावीपणे वापर केला. मूकनायकामधून त्यांचे वृत्तपत्रीय लेखन सर्वप्रथम प्रगट झाले. मूकनायकचा जन्म म्हणजे आंबेडकरी चळवळीचा मूळारंभ होय. खरे तर सोमवंशीय मित्र, हिंद नागरिक, विटाळविध्वंसक यासारखी वृत्तपत्रे मूकनायकापूर्वी निर्माण झाली होती व काळाच्या ओघात लोपही पावली होती. या वृत्तपत्रांनी दलित पतितांच्या जीवनातील व्यथा-वेदना, आकांत-आक्रोश आपापल्या मगदुराप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला. या वृत्तपत्रांमधून आंबेडकरी पत्रकारितेचे धूसरपणे का होईना, संसूचन होते. पण आंबेडकरी पत्रकारितेची खरीखुरी नवी पहाट उदयास आली, ती मूकनायकामधूनच होय.
आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये वृत्तपत्रांनी बजावलेली भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चांगल्या प्रकारे ज्ञात होती. तळा-गाळातील दलित वर्गामध्ये नवजागृती आणण्यासाठी वृत्तपत्राखेरीज अन्य प्रभावी साधन कोणतेही नाही, याची त्यांना प्रकर्षाने जाणीव होत होती. एकोणिसाव्या शतकामध्ये वृत्तपत्रांच्या माध्यमातून अस्तित्वात आलेला प्रबोधनाचा विचार प्रवाह त्यांना अवगत होता. विसाव्या शतकातील प्रबोधन बाबासाहेबांना आपल्या वृत्तपत्रांमधून आकारास आणायचे होते. दलित-शोषितांच्या भाव-भावनांना वाचा फोडण्याच्या प्रयत्नातून त्यांच्या वृत्तपत्रांचा जन्म झाला. १९१९ मध्ये आलेल्या साऊथबरो कमिशनच्या वेळी आंबेडकरांना वृत्तपत्राची प्रकर्षाने आवश्यकता वाटू लागली. अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची मागणी व
(चौवीस)