MR/Khand_19 - Page 33

दलितवर्गाची कैफियत अस्पृश्यांचा प्रतिनिधीच अंतरीच्या उमाळ्यातून मांडू शकतो, हे साऊथबरो कमिशनच्या निमित्ताने त्यांच्या लक्षात आले. हजारो वर्षाच्या मुक्या मनांना जिवंत करण्याच्या गरजेपोटी ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक या पाक्षिकाचा जन्म झाला. छत्रपती शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीमुळे या पाक्षिक वृत्तपत्राला मूर्त रूप धारण करणे शक्य झाले.

बाबासाहेब आंबेडकरांचे मूकनायक सर्व अंगांनी अर्थपूर्ण होते. या वृत्तपत्राच्या पहिल्याच अंकात त्यांनी वृत्तपत्रनिर्मितीसंबंधीची भूमिका निःसंदिग्ध स्वरुपात व्यक्त केली आहे. ते लिहितात, “ आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱया अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास, तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खर्‍या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे न्याहाळून पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट जातींचे हितसंबंध पाहाणारी आहेत. इतर जातींच्या हिताची त्यांना पर्वा नसते. इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात..... दीनमित्र, जागरुक, डेक्कन रयत, विजयी मराठा, ज्ञानप्रकाश, सुबोधपत्रिका वगैरे पत्रांतून बहिष्कृत समाजाच्या प्रश्‍नांची चर्चा वारंवार होते. परंतु ब्राह्मणेतर या संज्ञेखाली मोडत असलेल्या अनेक जातींच्या प्रश्‍नांचा ज्यात खल होतो ; त्यात बहिष्कृतांच्या प्रश्‍नांचा सांगोपांग उहापोह होण्यास पुरेशी जागा मिळणे शक्य नाही, हेही पण उघड आहे. त्यांच्या अतिबिकट स्थितीशी संलग्न असलेल्या प्रश्‍नांची चर्चा करण्यास एक स्वतंत्र पत्र पाहिजे हे कोणीही कबूल करील. ही उणीव भरून काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे.“ बाबासाहेबांनी वृत्तपत्राची निर्मिती प्रेरणाच या ठिकाणी व्यक्त केली आहे. वृत्तपत्रांची भूमिका ही सर्व जाती-जमातींच्या कल्याणाची असावी, या प्रकारची सार्थ अपेक्षा ते येथे विशद करतात.

बाबासाहेबांचा मूकनायक मोठ्या ध्येयनिष्ठेतून आकारास आलेला आहे. त्यांची ध्येयनिष्ठा ही समाजजागृतीची निष्ठा आहे. बाबासाहेबांची वृत्तपत्रनिर्मिती सामाजिक बांधिलकीच्या तत्त्वातून झालेली आहे. या वृत्तपत्राच्या बिरूदावलीवरून त्यांच्या वृत्तपत्राचे सामाजिक ध्येयधोरण चांगल्याप्रकारे अभिव्यक्त होते,

(पंचेवीस)