२८० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
समजतात. ब्राह्मणाचे हातचें कोणीहि खातो. ब्राह्मणाचें हातचें शिजलेले अन्न स्पृश्य अस्पृश्य यांनीं मिळून एका पंक्तीला बसून खाल्लें तर त्यांत ब्राह्मण्याला कांहींच धोका पोहोंचत नाहीं. तें अढळ राहतें. सहभोजनाचा मुख्य हेतु जर ब्राह्मण्यविध्वंसन हा असेल तर अस्पृश्यांनी शिजविलेले अन्न ब्राह्मणांना खावयास लावलें पाहिजे. तो प्रकार या सहभोजनप्रसंगीं घडला म्हणून या सहभोजनाला विशेष महत्व आहे असें आम्ही समजतो. याच प्रसंगी घडलेली दुसरी अपूर्व गोष्ट म्हणजे ही कीं या सहभोजनांत शाळेच्या व तालमीच्या शेजारी असलेल्या इस्पितळांतील भंगी लोकहि स्पृश्य लोकांशीं मांडीशीं मांडी लावून पंगतीला बसले होते. नुसता अस्पृश्य आहे असें म्हटलें तर कांही ब्राह्मण्यग्रस्त स्पृश्य लोकांना शिसारी येते. अनोळखी अशा अस्पृश्यांची संगत करण्याची गांठ पडली तर ते कसा बसा कड सोसून वेळ मारून नेतात. असा जेथें प्रकार आहे तेथें आपल्या देखत भंग्याचा धंदा करित असलेल्या माणसाला पंक्तिपावन करणें ही मोठ्याच मनोधैर्याची गोष्ट आहे हैं ब्राह्मण्याची जाणीव असणारा कोणीही माणूस नाकबूल करणार नाहीं. या मंगलमय पर्वणीचें सारें श्रेय आमचे उत्साही मित्र डॉ. आपटे यांना आहे. ही वार्षिक पर्वणीची बाब न राहतां हा नेहमींचा शिरस्ता होईल अशी कांही तरी भाईपरमानंद यांच्या जातपात तोडक मंडळाच्या धर्तीवर नित्याची व्यवस्था करण्यांत यावी अशी डॉ. आपटे यांस आमची प्रेमाची सूचना आहे.
या सहभोजनाला एकंदर ७०/८० माणसें हजर होतीं. जागा लहान व वेळ थोडा या दोन कारणांमुळे सहभोजनांत भाग घेण्यास उत्सुक असणाऱ्या दुसऱ्या कित्येकांना आमंत्रणें पाठविण्यांत आलीं नव्हतीं. तथापि माटुंगा हिंदु महासभेचे चिटणीस डॉ. उद्गांवकर यांना आपल्या मित्रमंडळींसह भोजनास येण्यास आमंत्रण देण्यांत आलें होतें. त्यास मान देऊन डॉक्टर साहेब युरोपीयन पद्धतीप्रमाणे एक मिनीट मागें पुढें न होऊ देता नेमके बाराला आले व "खाना तयार है“ म्हणून तेथल्या मुदपाक्यांना त्यांनी सवाल केला. 'थोडा वेळ आहे,' असें उत्तर मिळाल्याबरोबर स्वारी जरा गरम झाली व “हम जाता है, हमकू दूसरा काम है“ असें म्हणून निघून गेली. जातांना डॉक्टर महाशयांनी एक पत्र लिहून ठेवलें होतें. त्यांत “हिंदु सभेनें आतांपर्यंत अशी सहभोजने घडवून आणलेलीं आहेत. मात्र ती प्रसिद्ध न करतां घडवून आणलेलीं आहेत व यापुढेही हिंदु सभा अशीं सहभोजने घडवून आणील" असें जळफळीचे उद्गार काढलेले होते. हिंदुमहासभेला हा सहभोजनाचा कार्यक्रम जर आवडतो व तिनें मागें केला आहे व पुढेंहि जर ती करणार आहे तर तिच्या चिटणीसांनी आमंत्रणाबद्दल आनंद व्यक्त करावयास पाहिजे होता. पण