सहभोजन "' गुपचूप ˆ” . . . अन्यथा . . . २८१
त्यांना तर राग आला ! आम्हाला तरी असें वाटतें कीं आपण हिंदु संघटणांच्या लंब्याचवड्या बाता झोंकतों तेव्हां त्याप्रमाणें आपण वागतों किंवा नाहीं याची कसोटी करण्यासाठींच आपल्याला हें आमंत्रण दिलें गेलें असें या डॉक्टर साहेबांस वाटल्यावरून त्यांना राग आला असावा. खरे म्हटलें असतां हें सहभोजन झालें तें केवळ हिंदु महासभेला लाजविण्यासाठीं किंवा तिच्या चिटणीसांची परीक्षा घेण्याच्या हेतूनें घडविण्यांत आलें नव्हतें. तथापि त्यांना तसें वाटणें साहजिक आहे, परंतु चिटणीस साहेबांनी रागें भरण्या ऐवजीं लोक आपल्या वर्तनाबद्दल संशय कां घेतात याचाच आधीं विचार करावा व संशयाचें कारण दूर करावें म्हणजे त्यांना आमंत्रणाचा शीण कोणी देणार नाहीं. चिटणीस महाशय सहभोजन करीत नसतील असें आम्हीं म्हणत नाहीं पण त्यांची प्रसिद्धी होत नसल्याकारणाने ते बोलल्याप्रमाणें वागतात असें समजण्यास कांही मार्ग नाहीं. पुष्कळ सनातन धर्मवादी लोकहि सहभोजनांत भाग घेतात. पण त्याची बाच्यता करण्यास ते इतके भितात कीं "न व्हावें तें झाले” असें समजून त्याच्यावर “गुपचूप” घेतात. तेणेंकरून ते सहभोजन करीत असूनहि करीत नाहींत असाच भ्रम सर्वत्र पसरलेला राहतो. हा गैरसमज पसरण्यास त्याचे तेच कारणीभूत असतात तीच गत डॉक्टर महाशयांची असूं शकेल. त्याचा उपाय त्यांच्याच हातांत आहे आणि तो हाच कीं त्यांनी करीत असलेल्या सहभोजनावर ''गुपचूप'' न घेतां तें जाहीर करीत जावें. नाहीं तर सहभोजन करीत असूनहि ते करीत नाहींत या भ्रमाने समाजांतील जहाल लोक अशा प्रकारचीं आमंत्रणे देऊन त्यांचा छळ केल्यावाचून राहणार नाहींत.
आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. १६ सप्टेंबर १९२७.