`` काय करू आता धरूनिया भीड |
निःशंक हे तोंड वाजविले ।।
नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण |
सार्थक लाजून नव्हे हित ॥ ''
आपल्या वृत्तपत्राची ध्येयनिष्ठा प्रगट करताना बाबासाहेब संत तुकारामांच्या ओळींचा आधार घेतात. या ओळी निवडण्यात मोठे औचित्य आहे. तुकारामांच्या या अत्यंत अर्थपूर्ण ओळी बिरूदावलीच्या रूपात उद्धृत करीत बाबासाहेब मूक समाजाचे अंतर्मनच वाचकांसमोर उलगडून दाखवितात. बाबासाहेबांचा मूकनायक हा असा सर्वार्थाने समाजपरिवर्तनासाठी सिद्ध झाला आहे.
या खंडामध्ये मूकनायकातील बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण लेख संपादित करण्यात आले आहेत. स्वराज्याची सर सुराज्याला नाही ! हे स्वराज्य नव्हे, हे तर आमच्यावर राज्य, स्वराज्यातील आमचे आरोहण, राष्ट्रांतील पक्ष हे लेख येथे संग्रहित केले आहेत. या लेखांतील आशयाचे अवलोकन केल्यास या लेखांची मौलिकता ध्यानात येऊ शकते. भारतीय समाजरचनेबद्दल तसेच राजकीय व्यवस्थेबद्दल बाबासाहेबांच्या कल्पना सुस्पष्ट आहेत. या लेखांच्या शीर्षकांवरून आशयतत्त्वाची निःसंदिग्ध मांडणी प्रत्ययास येते. बाबासाहेब स्वराज्याचा विचार करताना त्याचा विचार समग्र समाजाच्या उत्थानासंदर्भात करतात. म्हणूनच स्वराज्याची सर सुराज्याला नाही असे राष्ट्रीय सभेने कितीही म्हटले असले तरी स्वराज्य कोणाचे व ते कशासाठी हे कळल्याखेरीज या तत्वाची री आम्ही ओढू शकत नाही हे स्वच्छपणे बाबासाहेब प्रतिपादन करतांत. स्वराज्याबद्दलचे बाबासाहेबांचे विचार पूर्णपणे परंपरामुक्त स्वरूपाचे आहेत. ते दलित-मुक्तीच्या व बहुजनमुक्तीच्या कल्पनेतून स्वराज्याकडे पाहतात, एतद्देशीयांचे स्वराज्य दलित-शोषित-वर्गाला आणखी गुलाम करणारे राहील, ही त्यांची शंका वास्तवदर्शी आहे. म्हणूनच ते हे स्वराज्य नव्हे, हे तर आमच्यावर राज्य असे निर्भिडपणे प्रतिपादन करू शकतात. बाबासाहेबांचे मूकनायकातील लेखन हे याप्रकारे राजकीय प्रश्नोपप्रश्नांचे साक्षेपी विश्लेषण सादर करते. बाबासाहेबांना दलित वर्गाची सामाजिक जागृती करायची होलीच, त्याचबरोबर त्यांना विशेषत्वाने राजकीय जागृतीदेखील निर्माण करायची होती. या सर्वंकष जागृतीचे प्रत्यंतर मूकनायकातील लेखांतून उत्कटपणे साकार होते.
बाबासाहेब आंबेडकरांचा मूकनायकापासून सुरू झालेला वृत्तपत्रीय लेखनाचा प्रवास बहिष्कृत भारतामध्ये विशाल रूप धारण करतो.
(सव्वीस)